पूर्ववैमनस्यातून तासगावात तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:24 IST2021-04-03T04:24:06+5:302021-04-03T04:24:06+5:30
तासगाव : तासगाव शहरातील महात्मा गांधी उद्यानासमोर शुक्रवारी सायंकाळी लवेश सुधाकर धोत्रे (वय २०, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, तासगाव) याचा ...

पूर्ववैमनस्यातून तासगावात तरुणाचा खून
तासगाव : तासगाव शहरातील महात्मा गांधी उद्यानासमोर शुक्रवारी सायंकाळी लवेश सुधाकर धोत्रे (वय २०, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, तासगाव) याचा पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्रांनी भोसकून खून करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी हे कृत्य केले. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेने तासगाव शहरात खळबळ उडाली हाेती.
गेल्या काही महिन्यांपासून शहरातील दोन गटांमध्ये सुरू असलेल्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम तास पोलीस ठाण्यात सुरू होते. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयात मृत लवेश याचे नातेवाईक व संबंधितांनी मोठी गर्दी केली होती.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील दोन गटांमध्ये धुसफूस सुरू होती. त्यातून वाद सुरू होता. हा वाद मिटविण्यासाठी तासगाव पालिकेच्या महात्मा गांधी उद्यानासमोर दोन्ही गटांतील तरुण एकत्र आले हाेते. यावेळी पुन्हा वाद झाला. लवेश धोत्रे याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. काहीजणांनी त्याला तत्काळ रुग्णालयात हलवले, मात्र त्याचा मृत्यू झाला.
घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली. ग्रामीण रुग्णालयात लवेश याचे नातेवाईक तसेच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. तासगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. आरोपींची नावे निष्पन्न झाली असून लवकरच त्यांना ताब्यात घेण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.