जिल्ह्यात होतोय आठवड्याला एक खून
By Admin | Updated: November 11, 2014 23:20 IST2014-11-11T23:05:30+5:302014-11-11T23:20:25+5:30
प्रमाण वाढले : दोन महिन्यात दहा घटना; सांगली, मिरजेत पाच गुन्ह्यांची नोंद

जिल्ह्यात होतोय आठवड्याला एक खून
सचिन लाड - सांगली -जिल्ह्यात गेल्या सव्वादोन महिन्यात एकापाठोपाठ एक दहा खून झाले आहेत. आठवड्याला एक खून, असे प्रमाण आकडेवारीवरून दिसून येत आहे. या कालावधित सांगली, मिरजेतच पाच खून झाले आहेत. खुनाच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असले तरी, सर्व गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहेत. या दहा खुनातून १५ नवीन गुन्हेगार रेकॉर्डवर आले आहेत.
अनैतिक संबंध, कौटुंबिक वाद, आर्थिक वाद, पूर्ववैमनस्य, दारूची नशा ही खुनामागची कारणे आहेत. महिन्यापूर्वी सांगलीत रात्रीत दोन खुनाच्या घटना उघडकीस आल्या. दोन्ही खून अनैतिक संबंधातून झाल्याचे उघडकीस आले. यातील एका खुनाचा २४ तासांत छडा लागला; मात्र शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शशिकांत पावसकर या तरुणाच्या खुनाचे गूढ उकलण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. सांगली रेल्वे स्थानकापासून अर्धा किलोमीटर अंतरावर दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. या घटनेला आठवड्याचा कालावधी पूर्ण झाला नाही, तोपर्यंत विजयनगरमध्ये आकाश गस्ते या तरुणाचा गळा चिरून खून केल्याचे उघडकीस आले.
गेल्या आठवड्यात अंकलखोप (ता. पलूस) येथे दारूच्या नशेत एकाने पत्नी व मुलांचा खून केला. तत्पूर्वी वाळवा तालुक्यातील बोरगाव आणि कासेगाव येथील दोन महिलांचा अनैतिक संबंधातून खून झाला. जत तालुक्यातील एका शिक्षकाचा थरारक पाठलाग करून भरदिवसा खून केला. भावाला मारहाण केल्याचा जाब विचारल्याच्या क्षुल्लक कारणावरून मिरजेत तरुणाचा खून झाला.
खुनाच्या सातत्याने घटना घडत असल्या तरी, त्याचा छडा लावून संशयितांना अटक केली जात आहे. दहा खुनाच्या गुन्ह्यांतून १५ नवीन गुन्हेगार पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत. हे सर्वजण सध्या कारागृहात आहेत.
चौघांचा संशयास्पद मृत्यू
खुनी हल्ल्याच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. याशिवाय घाटनांद्रे (ता. कवठेमहांकाळ) येथील सुभाष झांबरे खून-खटल्यातील साक्षीदार, बनाळीतील (ता. जत) विवाहिता, राजेवाडीतील (ता. आटपाडी) शेतमजूर या तिघांचा संशयास्पद मृत्यू झाला. तपासातून त्यांच्या मृत्यूचे गूढ अद्याप उघडले नाही. महिन्यापूर्वी सांगलीतील कृष्णा नदीच्या काठावर अनोळखी तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. त्याची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले नाही.