शेत रस्त्याच्या वादातून बेडग येथे वृध्द महिलेचा गळा दाबून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:18 IST2021-06-21T04:18:57+5:302021-06-21T04:18:57+5:30
मिरज : बेडग (ता. मिरज) येथे शेतरस्त्याच्या वादातून सुलाबाई आनंदा पाटील (वय ६८) या वृध्द महिलेचा गळा दाबून ...

शेत रस्त्याच्या वादातून बेडग येथे वृध्द महिलेचा गळा दाबून खून
मिरज : बेडग (ता. मिरज) येथे शेतरस्त्याच्या वादातून सुलाबाई आनंदा पाटील (वय ६८) या वृध्द महिलेचा गळा दाबून खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी पिता-पुत्रास अटक केली आहे.
बेडग येथे शनिवारी दुपारी सुलाबाई पाटील यांचा मृतदेह त्यांच्या शेतात संशयास्पद स्थितीत आढळून आला हाेता. मिरज ग्रामीण पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणी केली. यामध्ये सुलाबाई यांचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर व पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी तातडीने सूत्रे हलवत मृत सुलाबाई यांच्यासोबत शेत रस्त्याचा वाद सुरु असलेल्या दादासाहेब अगणु पाटील (वय ५०) व त्यांचा मुलगा सौरभ दादासाहेब पाटील (वय २८ रा. बेडग) या दोघांना अटक केली. दोघांनी शेत जमिनीच्या सामायिक रस्त्याच्या वादातून सुलाबाई पाटील यांचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
बेडगमध्ये मंगसुळी फाटा येथे सुलाबाई पाटील यांची शेतजमीन आहे. शनिवारी दुपारी एक वाजता त्या नेहमीप्रमाणे जनावरांना वैरण आणण्यासाठी शेताकडे गेल्या होत्या. आजी परत न आल्याने त्यांच्या नातीने शोधाशोध सुरु केली. यावेळी शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. सुलाबाई यांचा गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी दादासाहेब पाटील आणि त्यांचा मुलगा सौरभ यांना अटक केली. शेत रस्त्याच्या कारणावरुन वाद झाल्यानंतर पिता-पुत्रांनी त्यांचा गळा दाबून खून केल्याचा संशय आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली.