मिरजेतील खून प्लॉट विक्रीच्या वादातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:10 IST2021-01-13T05:10:46+5:302021-01-13T05:10:46+5:30

मुनीर शेख व राजू शेख हे दोघे सख्खे मावसभाऊ आहेत. वाळू व्यवसाय करणाऱ्या मुनीर यास राजू हा ...

From the murder plot sale dispute in Miraj | मिरजेतील खून प्लॉट विक्रीच्या वादातून

मिरजेतील खून प्लॉट विक्रीच्या वादातून

मुनीर शेख व राजू शेख हे दोघे सख्खे मावसभाऊ आहेत. वाळू व्यवसाय करणाऱ्या मुनीर यास राजू हा व्यवसायात मदत करीत हाेता. यासाठी मुनीर हा राजूला दरमहा दहा हजार रुपये देत होता. व्यवसायात मदतीबद्दल मुनीर याने त्याच्या मालकीच्या साडेपाच गुंठे प्लॉटमधील दीड गुंठे प्लॉट राजूस देण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र पंधरा दिवसांपूर्वी मुनीर याने साडेपाच गुंठ्याच्या प्लॉटची परस्पर विक्री केली. याची माहिती राजू याला समजल्याने पंधरा दिवसात चार-पाच वेळा मुनीर व राजू यांच्यात वादावादीचा प्रकार घडला. राजू याने जाब विचारल्यानंतर ‘मी प्लॉट विकला आहे, तूला काही देणार नाही, तूला काय करायचे ते कर’ असे मुनीर याने बजावल्याने राजू संतापला होता.

सोमवारी रात्री मुनीर हा मद्यपानासाठी सनशाईन बारमध्ये गेला. हे समजल्यानंतर अर्ध्या तासाने राजू तेथे गेला. प्लाॅट देण्याचा शब्द पाळला नसल्याबाबत तेथेही दोघांत पुन्हा वाद झाला. राजू यास काहीही देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात राजू याने धारधार चाकूने मुनीर याच्यावर वार करून पलायन केले. चाकूचे वार वर्मी बसल्याने मुनीर हा गंभीर जखमी झाला. रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला. खुनाच्या या घटनेचे बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रण झाले आहे.

मुनीरचा खून केल्यानंतर राजू शेख रेवणी गल्लीत थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने त्यास ताब्यात घेतले. राजू याने खुनाची कबुली दिली असून, त्याला तीन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली. याबाबत गांधी चौक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

फाेटाे : १२ राजू शेख (सिंगल)

फाेटाे : १२ मुन्ना मांगलेकर (सिंगल)

Web Title: From the murder plot sale dispute in Miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.