Murder of nephew by putting Nimsod on his head | निमसोडला दांडके डोक्यात घालून पुतण्याचा खून

निमसोडला दांडके डोक्यात घालून पुतण्याचा खून

कडेगाव : निमसोड (ता. कडेगाव) येथे जमिनीच्या वादातून लाकडी दांडके डोक्यात घालून चुलता आणि चुलत भावाकडून पुतण्याचा खून करण्यात आला. सूर्यकांत ऊर्फ सुरेश आत्माराम जाधव (वय ३५, रा. निमसोड) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी भगवान दाजी जाधव (६२) व कैलास भगवान जाधव (४२, दोघेही रा. निमसोड) यांच्याविरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते. ही घटना शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी सातच्यासुमारास घडली.

सूर्यकांत जाधव आणि त्यांचा चुलता भगवान जाधव व चुलत भाऊ कैलास जाधव यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीचा वाद सुरू आहे. दोन्ही कुटुंबे शेजारी-शेजारी राहतात. शुक्रवारी सायंकाळी यांच्यातील हा वाद पुन्हा उफाळून आला. या वादातून भगवान जाधव व त्यांचा मुलगा कैलास जाधव यांची सूर्यकांत जाधव यांच्याशी बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर याचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. यावेळी जवळ पडलेले लाकडी दांडके संशयित कैलास जाधव याने सूर्यकांत जाधव यांच्या डोक्यात मारले. त्यामुळे सूर्यकांत यांच्या डोक्याला गंभीर इजा होऊन ते खाली पडले. ते खाली पडल्याचे पाहून भगवान जाधव व कैलास जाधव यांनी तेथून पोबारा केला.

नातेवाईकांनी सूर्यकांत यांना तालुक्यातील कडेपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Murder of nephew by putting Nimsod on his head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.