पन्हाळ्याजवळ अपघातात मिरजेची युवती ठार

By Admin | Updated: November 15, 2015 01:12 IST2015-11-15T01:12:29+5:302015-11-15T01:12:55+5:30

अज्ञात वाहन व दुचाकी यांच्यात धडक

Murder killed woman in an accident near Panhala | पन्हाळ्याजवळ अपघातात मिरजेची युवती ठार

पन्हाळ्याजवळ अपघातात मिरजेची युवती ठार

कोल्हापूर : कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावरील वाघबीळ येथे अज्ञात वाहन व दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत मिरज येथील युवती ठार, तर युवक जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. ऋचा विनोद कोकाटे (वय १८, रा. द्वारकानगर, कुपवाड रोड, मिरज, जि. सांगली) असे मृत युवतीचे नाव असून, अभिषेक कुमार कोडते (वय २३, रा. सलमान हॉटेलजवळ, कुपवाड रोड, मिरज) हा जखमी झाला. अभिषेकवर कोल्हापुरातील कदमवाडीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत नातेवाइकांनी सांगितले की, मिरज येथील अभिषेक कोडते व ऋचा कोकाटे हे दोघेजण दुचाकीवरून पन्हाळा येथे शनिवारी सकाळी गेले होते. सायंकाळी हे दोघे दुचाकीवरून पन्हाळ्याहून कोल्हापूरकडे वाघबीळमार्गे येत होते. त्यावेळी अज्ञात वाहनाची व अभिषेकच्या दुचाकीची धडक झाली. या धडकेत ऋचा कोकाटे ही मुलगी जागीच मृत झाली, तर अभिषेक जखमी झाला. अपघातानंतर या दोघांना जखमी अवस्थेत नागरिकांनी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी जखमी झालेल्या अभिषेकवर प्राथमिक उपचार करून त्याला खासगी रुग्णालयात पाठविले. अभिषेकच्या मोबाईलवरून कोकाटे व कोडते या कुटुंबीयांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मृत ऋचा कोकाटे यांची आई मनाली, भाऊ, इतर नातेवाईक व अभिषेकचे वडील कुमार कोडते हे ‘सीपीआर’मध्ये आले. मुलगी मृत झाल्याचे समजताच ऋचाच्या आईला शोक अनावर झाला.
मृत ऋचा कोकाटे ही विश्रामबाग येथील चिंतामण व्यापार व वाणिज्य महाविद्यालयात बी. बी. ए.च्या द्वितीय वर्षात, तर अभिषेक हा बी.बी.ए.च्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहेत. ऋचाचे वडील आर्किटेक्ट-इंजिनिअर असून, आई गृहिणी आहे. जखमी अभिषेकच्या वडिलांचा कोल्हापूर चप्पलचा व्यवसाय आहे. या अपघाताची नोंद सीपीआर पोलीस चौकीत रात्री उशिरा झाली. (प्रतिनिधी)

 

Web Title: Murder killed woman in an accident near Panhala