उटगीत जमिनीसाठी पुतण्याकडून चुलत्याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:25 IST2021-03-05T04:25:31+5:302021-03-05T04:25:31+5:30
उमदी : उटगी (ता. जत) येथे शेतजमिनीच्या वादातून अंगावर टेम्पो घालून पुतण्याने चुलत्याचा खून केला. मल्लाप्पा धुंडाप्पा केसगोंड (वय ...

उटगीत जमिनीसाठी पुतण्याकडून चुलत्याचा खून
उमदी : उटगी (ता. जत) येथे शेतजमिनीच्या वादातून अंगावर टेम्पो घालून पुतण्याने चुलत्याचा खून केला. मल्लाप्पा धुंडाप्पा केसगोंड (वय ५५, रा. उटगी) असे मृताचे नाव आहे. ही घटना बुधवार, दि. ३ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान उटगी ते चनगोंड वस्ती रस्त्यावर घडली. याप्रकरणी संशयित भालचंद्र ऊर्फ भाल्या सिद्धाप्पा केसगोंड (४०) याच्यावर गुन्हा दाखल झाला असून, तो फरारी आहे.
याबाबत मृताचा भाचा चिदानंद शिवलिंगप्पा तेली यांनी फिर्याद दिली आहे.
मल्लाप्पा धुंडाप्पा केसगोंड यांची उटगीतील चनगोंड वस्ती येथे शेती आहे. ते पत्नी व मुलासह शेतातच राहत होते. मल्लाप्पा केसगोंड व पुतण्या भालचंद्र ऊर्फ भाल्या सिद्धाप्पा केसगोंड यांच्यामध्ये २० वर्षांपासून जमिनीचा वाद होता. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी उच्च न्यायालयात दावा दाखल आहे.
बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान मल्लाप्पा केसगोंड शेताकडे दुचाकीवरून जात होते. यावेळी भाल्या केसगोंड याने टेम्पोने (क्र. एमएच १० झेड. ३८३५) पाठीमागून येऊन त्यांच्या दुचाकीस जोरात धडक दिली. मलाप्पा दुचाकीसह काही अंतरापर्यंत फरफटत गेले. त्यांच हात, पाय व डोक्याला गंभीर मार लागला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संशयत पसार झाला.
ही घटना शेतजमिनीच्या वादातून झाली असून संशयित भालचंद्र सिद्धाप्पा केसगोंड यानेच रागातून अंगावर टेम्पो घालून खून केला आहे, अशी फिर्याद चिदानंद शिवलिंगप्पा तेली यांनी दिली.
ही माहिती मिळताच उमदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय कोळेकर व पोलीस उपनिरीक्षक नामदेव दांडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह जत ग्रामीण रुग्णालय येथे विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घटनास्थळी जतचे उपविभागीय पोलीस अधीक्षक रत्नाकर नवले यांनी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय कोळेकर अधिक तपास करत आहेत.