मुलांच्या भांडणातून खुनीहल्ला
By Admin | Updated: March 22, 2015 00:25 IST2015-03-22T00:25:45+5:302015-03-22T00:25:45+5:30
चौघांविरुद्ध गुन्हा : दोघांना अटक; पोलीस कोठडी

मुलांच्या भांडणातून खुनीहल्ला
सांगली : लहान मुलांच्या भांडणावरून झालेल्या वादातून तरुणावर चाकू, लोखंडी सळई व बॅटने खुनीहल्ला केल्याची घटना संजयनगरमध्ये १८ मार्चला घडली आहे. या हल्ल्यात बाळू किसन दुधाळ (वय १९, रा. संजयनगर, सांगली) हा तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध संजयनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील प्रमोद शिवाजी लिमगेडमाळी व विजय राजू मस्के या दोघांना अटक करण्यात आली आहे, तर दोघे अल्पवयीन असल्याने त्यांची बालसुधारगृहात रवानगी झाली आहे.
हल्ल्यात जखमी झालेल्या दुधाळ याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्याच्या डोक्याला गंभीर स्वरुपाची दुखापत झाली आहे. लहान मुलांमध्ये खेळताना भांडण झाले होते. त्यावेळी या भांडणातून बाळू दुधाळ व संशयितामध्ये चेष्टामस्करी सुरू झाली. एकमेकांची चेष्टा करताना शिवीगाळ झाल्याने त्याचे पर्यवसान वादावादी व मारामारीत झाले. संशयितांनी दुधाळवर चाकू, लोखंडी सळई व बॅटने हल्ला केला. यात दुधाळ गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला होता.
संजयनगर पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून संशयिताविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर प्रमोद लिमगेडमाळी व विजय मस्के या दोघांना तातडीने अटक केली, तसेच अन्य दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांना न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने लिमगेडमाळी व मस्के या दोघांना २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. अल्पवयीन संशयितांची बालसुधारगृहात रवानगी केली. (प्रतिनिधी)