पलूस : बुर्ली (ता. पलूस) येथे भावजयीचा खून करून आत्महत्या केल्याचा तरुणाचा बनाव पोलिसांनी उघडकीस आणला. सायली केतन पवार (वय २२, रा. बुर्ली) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कुणाल महादेव पवार (वय २८) याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने दि. २९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
बुर्ली येथे दि. २४ सप्टेंबर रोजी सायली पवार घरी जिन्यावरून पाय घसरून पडून जखमी झाली, असे कारण देत दीर कुणाल पवार याने तिला रात्री मृतावस्थेत सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी तिच्या डाव्या हाताच्या मनगटावर, गळ्यावर व उजव्या कानाच्या खाली जखम झाली होती. या जखमा धारधार शस्त्रांनी केल्याचा संशय आल्याने शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी पलूस पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली.
ही माहिती मिळाल्यानंतर सायलीचा भाऊ सूरज सुधाकर नवगण (रा. बार्शी) याने पलूस पोलिसात फिर्याद दिली होती. यामध्ये घरगुती वादातून कुणालने धारधार शस्त्राने वार करून सायलीला जखमी केले व आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला। असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी कुणालला गुरुवारी अटक घेऊन न्यायालयात हजर केले असता, त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. पलूस पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव अधिक तपास करत आहेत.