इस्लामपुरात आरक्षित जागेवरून नगरपालिका-पोलिसांत वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:18 IST2021-07-04T04:18:46+5:302021-07-04T04:18:46+5:30
इस्लामपूर : जुना बहे नाका येथील शासकीय जागेत झोपडपट्टी असून, २५ खोकीधारक ३० वर्षांहून अधिक काळ व्यवसाय करून पोट ...

इस्लामपुरात आरक्षित जागेवरून नगरपालिका-पोलिसांत वाद
इस्लामपूर : जुना बहे नाका येथील शासकीय जागेत झोपडपट्टी असून, २५ खोकीधारक ३० वर्षांहून अधिक काळ व्यवसाय करून पोट भरत आहेत; परंतु या जागेवर पोलिसांनी हक्क दाखविला असून, खोकीधारक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे त्यांनी पालिकेकडे धाव घेतली आहे. पालिकेने या जागेबाबत पोलिसांकडे खुलासा मागितला आहे.
बहे नाका परिसरात तीस वर्षांहून अधिक काळापासून झोपडपट्टी आहे. त्यालगत बहे रस्त्यावर २५ छोटे व्यावसायिक स्वत:ची खोकी घालून संसार चालवीत आहेत. काही दिवसांपूर्वी अचानक इस्लामपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख यांनी या जागेवर येऊन मोजणी करत कुंपण घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर खोकीधारकांनी पालिकेतील विकास आघाडीचे पक्षप्रतोद विक्रम पाटील यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी या जागेची पाहणी करून आणि कागदपत्रे पाहून ही जागा पालिकेने व्यावसायिकांसाठी राखीव ठेवल्याने पोलीस बेकायदेशीरपणे कुंपण करत आहेत, असा दावा केला.
यावर पालिकेने दि. २५ जून रोजी पोलीस निरीक्षकांना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले की, मटण मार्केटसमोरील जागेवर पालिकेची आरक्षणे मंजूर असून पूर्व परवानगी घेतल्याशिवाय काहीही काम करता येत नाही.
त्यामुळे खोकीधारकांना थोडा दिलासा मिळत असताना पोलिसांनी पुन्हा कारवाईचे निर्देश दिल्याने खोकीधारक उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहेत.
कोट
ही जागा राज्य शासनाने पालिकेसाठी आरक्षित केली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्याशी चर्चाही झाली आहे; परंतु त्यांनी मोजणीप्रमाणे तारेचे कुंपण घालत असल्याचे स्पष्ट केले. हद्द ठरविण्याचा अधिकार मोजणी कार्यालयास आहे; परंतु या कार्यालयाने पालिकेला कोणतीही कल्पना दिलेली नाही. मोजणी झाल्यानंतर अतिक्रमणे निश्चित करून काढण्याचे अधिकार महसूल खात्याला आहेत. छोट्या व्यावसायिकांवर अन्याय होऊ देणार नाही.
-विक्रम पाटील, पक्षप्रतोद, इस्लामपूर नगरपालिका