महापालिका सभेत पुन्हा ‘कदम’ताल
By Admin | Updated: May 21, 2016 00:12 IST2016-05-20T23:49:04+5:302016-05-21T00:12:14+5:30
‘स्वीकृत’चा प्रस्ताव फेटाळला : कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सुनील कदम यांना रोखले

महापालिका सभेत पुन्हा ‘कदम’ताल
कोल्हापूर : पक्षीय राजकारणातून टीकेचे लक्ष्य बनलेले माजी महापौर सुनील कदम यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्यास महानगरपालिका सभागृहाने शुक्रवारी तिसऱ्यांदा नकार दिला. एकाच विषयावर तब्बल तीन तास प्रदीर्घ चर्चा आणि दोन वेळा मतदान घेण्यात आल्यानंतर बहुमताच्या जोरावर कदम यांचा सभागृहात येण्याचा दरवाजा पुन्हा एकदा बंद झाला. यावेळी कॉँग्रेस-राष्ट्रवादी तसेच भाजप-ताराराणी आघाडी यांनी कदम यांच्या संदर्भातील आपापले अभिवादन लेखी स्वरूपात सभागृहात सादर केले. त्यापैकी कॉँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांनी बहुमताच्या जोरावर ते मंजूर करून राज्य सरकारकडे पाठविण्याचा निर्णय घेतला.
महापौर अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज सुरू होताच सुनील कदम यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्याचा विषय चर्चेत घेण्यात आला. कदम यांना स्वीकृत म्हणून घेण्याकरिता यापूर्वी महासभेने पारित केलेले ठराव महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ४५१ अन्वये निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने महापालिकेकडे पाठविला आहे. तो माहितीसाठी प्रशासनाने महासभेसमोर ठेवला होता. हा प्रस्ताव महासभेने दोन वेळा नाकारला असल्याने त्यावर आता कोणतीही चर्चा करू नये, अशी भूमिका शारंगधर देशमुख, जयंत पाटील यांनी घेतली. त्याला भाजप, ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला.
चर्चेमुळे या विषयात वादंग निर्माण होणार हे लक्षात येताच नगरसचिव उमेश रणदिवे यांनी राज्य सरकारच्या या प्रस्तावावर सभागृहानेच अभिवेदन करायचे आहे, असे सांगीतले. त्यावर सभागृह म्हणजे नेमके कोण? याचे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी मागितले. ‘सभागृह म्हणजे सर्व सदस्य’ असा खुलासा करण्यात आला. त्यावेळी कॉँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील यांनी लेखी अभिवेदन देऊन तेच संपूर्ण सभागृहाचे आहे, असे समजून ते मंजूर करावे, असे सांगितले.
भाजप-ताराराणी आघाडीचे गटनेते विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, तसेच विरोधी पक्षनेते संभाजी जाधव यांनीही एक स्वतंत्र लेखी अभिवेदन दिले. त्यामुळे कोणाचे अभिवेदन स्वीकारावे आणि राज्य सरकारला पाठवावे हे ठरविण्याकरिता मतदानाचा विषय पुढे आला. आयुक्त पी. शिवशंकर, नगरसचिव उमेश रणदिवे यांनी सभागृह जो निर्णय घेईल त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल असे सांगितले. तेव्हा सर्वांनीच मतदानाचा आग्रह धरला. मतदानात कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे अभिवेदन ४१ विरुद्ध ३० मतांनी मंजूर झाले. यावेळी शिवसेनेचे तीन सदस्य तटस्थ राहिले. भाजप-ताराराणी आघाडीच्या अभिवेदनावरही मतदान झाले. त्यावेळी अभिवेदनाच्या बाजूने २९, तर विरोधात ४१ मते पडली.
कॉँग्रेस-राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, शारंगधर देशमुख, सूरमंजिरी लाटकर, भूपाल शेटे यांनी, तर भाजप-ताराराणी आघाडीकडून विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, संभाजी जाधव, अजित ठाणेकर, रूपाराणी निकम, किरण नकाते, किरण शिराळे यांनी युक्तिवाद केला.