महापालिकेचे चंद्रकांत आडके पुन्हा उपायुक्तपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:31 IST2021-08-12T04:31:17+5:302021-08-12T04:31:17+5:30
सांगली : महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयाकडील उपायुक्त स्मृती पाटील यांची मंगळवारी बदली झाली. त्यांच्या जागी नगरसचिव चंद्रकांत आडके यांच्याकडे ...

महापालिकेचे चंद्रकांत आडके पुन्हा उपायुक्तपदी
सांगली : महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयाकडील उपायुक्त स्मृती पाटील यांची मंगळवारी बदली झाली. त्यांच्या जागी नगरसचिव चंद्रकांत आडके यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच आडके यांच्याकडील उपायुक्तपदाचा पदभार काढून पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
स्मृती पाटील पाच वर्षे उपायुक्त म्हणून काम पाहत आहेत. त्यांची मुदत ३१ जून रोजी संपल्यानंतर आयुक्त नितीन कापडणीस यांनी त्यांना कार्यमुक्त केले होते. त्यांच्या जागी चंद्रकांत आडके यांच्याकडे प्रभारी उपायुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आडके सध्या महापालिकेचे प्रभारी नगरसचिव आहेत. ते गेली ३५ वर्षे सेवेत आहेत. त्यांनी आस्थापना अधिकारी, करनिर्धारक व संकलक, कामगार अधिकारी या पदावरही काम केले आहे. पाटील यांना कार्यमुक्त केल्यानंतर काही दिवसांत त्यांची पुन्हा या पदावर फेरनियुक्ती करण्यात आली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने त्यांच्याकडे उपायुक्तपदाचा कार्यभार सोपविण्यात आला;
पण मंगळवारी पाटील यांच्या बदलीचे आदेश महापालिकेला प्राप्त झाले. त्यांची पुणे येथील सहायक निबंधक सहकारी संस्था मुख्यालयात नियुक्ती झाली आहे. आयुक्त कापडणीस यांनी तात्काळ त्यांना कार्यमुक्त करीत त्यांच्या जागी आडके यांची नियुक्ती केली.