महापालिकेचा गैरकारभार विधिमंडळात!

By Admin | Updated: December 8, 2015 00:35 IST2015-12-07T23:42:26+5:302015-12-08T00:35:46+5:30

तारांकित प्रश्न : ड्रेनेज, पाणी, एलबीटी, बीओटी, रस्त्यांची कामे ऐरणीवर

The municipal corporation is responsible for corruption! | महापालिकेचा गैरकारभार विधिमंडळात!

महापालिकेचा गैरकारभार विधिमंडळात!

सांगली : महापालिकेच्या ड्रेनेज, पाणी योजनेसह बीओटी प्रकल्प, एलबीटी वसुली, अग्निशमन यंत्रणा आदींसह विविध प्रश्नांचा पाऊस विधिमंडळात पडणार आहे. मुंबईपासून ते कोल्हापूरपर्यंतच्या आमदारांनी महापालिकेविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाची धावपळ उडाली आहे. सर्वाधिक प्रश्न भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी उपस्थित केले आहेत. पण या प्रश्नांवर कितपत चर्चा होते, याविषयी साशंकता आहे.
महापालिकेच्या कारभाराची चर्चा नेहमीच राज्यपातळीवर झाली आहे. कधी विशेष लेखापरीक्षणातून उघड झालेल्या घोटाळ्याची, तर कधी घनकचरा प्रकल्प न राबविल्याने हरित न्यायालयाकडून झालेल्या कानउघाडणीची! त्यात आता हिवाळी अधिवेशनात उपस्थित प्रश्नांची भर पडली आहे. विधानपरिषदेतील आमदार संजय दत्त, महादेवराव महाडिक यांच्यापासून ते भाजपचे सुधीर गाडगीळ, जयंत पाटील या जिल्ह्यातील आमदारांनी महापालिकेविषयी तारांकित प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केले आहेत.
एलबीटीची थकबाकी १२५ कोटी असल्याबद्दल संजय दत्त, महाडिक यांनी माहिती मागविली आहे. एलबीटी वसुलीसाठी केलेल्या उपाययोजना, व्यापाऱ्यांवरील कारवाई आदीविषयी प्रश्न आहेत. पालिकेच्या ड्रेनेज व पाणी योजनेचे रखडलेले काम, अतिथीगृह पाडून बीओटीतून उभारले जाणारे व्यापारी संकुल, कालबाह्य झालेली अग्निशमन यंत्रणा, महासभेत ऐनवेळी झालेले ठराव, वित्त आयोगाच्या निधीचा गैरवापर आदीवर भाजपचे सुधीर गाडगीळ यांनी तारांकित प्रश्न दिले आहेत. यासंदर्भात शासनाकडून महापालिकेला माहिती मागविली आहे. अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाल्याने अधिकाऱ्यांनाही घाम फुटला असून, माहिती संकलनासाठी धावपळ सुरू आहे. पण या प्रश्नांवर कितपत चर्चा होते, याविषयी महापालिकेचे अधिकारी साशंक आहेत. (प्रतिनिधी)

चर्चा तर होणारच!
राज्यातील सत्ताबदल झाल्यानंतर महापालिकेच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरू झाला आहे. ड्रेनेज घोटाळा, घरकुलांचे निकृष्ट काम, रस्ते नुकसानभरपाई आदींची चौकशी सुरू आहे. त्यात गेल्या आठ वर्षातील कारभाराच्या विशेष लेखापरीक्षणाचे आदेशही नगरविकास विभागाने दिले आहेत. एकूण राज्याच्या पटलावरही महापालिकेचा कारभार हा चर्चेचा विषय ठरू लागला आहे.

Web Title: The municipal corporation is responsible for corruption!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.