पर्यावरण अहवालाचा महापालिकेला दहा वर्षांपासून विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 19:31 IST2019-05-19T19:31:15+5:302019-05-19T19:31:26+5:30
शीतल पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील विविध भागातील हवा, ध्वनी, जल प्रदूषणाची शास्त्रीयदृष्ट्या चाचणी करून नागरिकांना ...

पर्यावरण अहवालाचा महापालिकेला दहा वर्षांपासून विसर
शीतल पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील विविध भागातील हवा, ध्वनी, जल प्रदूषणाची शास्त्रीयदृष्ट्या चाचणी करून नागरिकांना प्रदूषणमुक्त जीवन जगण्यासाठी वातावरण तयार करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाने सर्वच महापालिकांना ३१ जुलैपूर्वी पर्यावरण सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे बंधन घातले आहे. पण गेल्या दहा वर्षांपासून या अहवालाचा सांगली महापालिकेला विसर पडला आहे. यंदाही हा अहवाल तयार होणार की नाही, असा प्रश्न आहे. अजून महापालिकेकडे तीन महिन्यांचा कालावधी आहे. या काळात पर्यावरणाचा अहवाल तयार होऊ शकतो. त्यासाठी प्रशासन, पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करण्याची गरज आहे.
महापालिका क्षेत्राचा विकास साधताना पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक असते. महापालिकेच्या मूलभूत व पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, घनकचरा, प्राणी व वनसंपदा, विरंगुळ्याची साधने, हवा, पाणी, ध्वनी प्रदूषण आदीचा अभ्यास करून पर्यावरण अहवाल तयार केला जातो. त्यातून लोकजागृती, हाही एक उद्देश आहे. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याचा ऊहापोह झाल्यास काही बाबींवर नियंत्रण आणता येते. पण साºया गोष्टींना सांगली महापालिकेने फाटा दिला आहे.
महापालिकेच्या स्थापनेपासून म्हणजे गेल्या १५ वर्षांत अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतपत पर्यावरण अहवाल तयार झाले. शेवटचा पर्यावरण अहवाल २००८-०९ मध्ये सादर झाला होता. तत्कालीन वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. राम हंकारे यांनी हा अहवाल तयार केला होता. त्यानंतर गेल्या दहा वर्षात पर्यावरण अहवाल तयार करण्याचाच विसर आरोग्य विभागाला पडला आहे. त्यामुळे प्रदूषणाची परिस्थिती आणखी गंभीर होत आहे.