महापालिकेची कमाई चार कोटींवर
By Admin | Updated: November 11, 2016 23:32 IST2016-11-11T23:32:14+5:302016-11-11T23:32:14+5:30
कर भरण्यासाठी लांब रांगा : जुन्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय प्रशासनाच्या पथ्यावर

महापालिकेची कमाई चार कोटींवर
सांगली : पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचा राज्य शासनाचा निर्णय महापालिकेच्या चांगलाच पथ्यावर पडला. शुक्रवारी घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता व नगररचना विभागाकडील थकीत करापोटी तब्बल चार कोटी ६ लाख रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले. मध्यरात्रीपर्यंत त्यात आणखी काही लाखाची भर पडली असणार आहे. दिवसभर कर भरण्यासाठी पालिकेच्या विविध विभागात नागरिकांनी गर्दी केली होती.
महापालिकेने थकीत करापोटी पाचशे व हजार रूपयांच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश राज्य शासनाने गुरुवारी सायंकाळी दिले. त्यानंतर आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी रात्रीपासूनच कराचा भरणा करण्यासाठी यंत्रणा उभी केली. सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरातील सात ठिकाणी पालिकेने यंत्रणा उभी केली. त्यासाठी ६० कर्मचारी नियुक्त करण्यात आले. प्रत्येक केंद्रावर बनावट नोटा तपासणीचे यंत्र बसविण्यात आले. एका केंद्रावर पाच ते सहा टेबल मांडून त्यावर कराचा भरणा करण्याची प्रक्रिया रात्रीपासूनच सुरू झाली. मध्यरात्री बारा वाजेपर्यंत आठ लाख रुपये पालिकेकडे जमा झाले होते.
पहाटे सहा वाजता पुन्हा या सात केंद्रांचे कामकाज सुरू झाले. आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपायुक्त सुनील पवार, स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त रमेश वाघमारे यांनी या केंद्रांना भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. सकाळी सात वाजल्यापासून कर भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी करण्यास सुरूवात केली. दहा वाजल्यानंतर काही केंद्रांवर मोठी गर्दी झाली होती. सांगलीच्या स्टेशन चौकातील घरपट्टी विभागाच्या मुख्य कार्यालयात तुडुंब गर्दी होती. या ठिकाणी सात ते आठ टेबलांवर पैसे स्वीकारले जात होते. तरीही कर्मचारी कमीच पडत होते. अखेर एलबीटी विभागाकडील कर्मचाऱ्यांनाही पैसे स्वीकारण्यासाठी नियुक्त करण्यात आले. सायंकाळपर्यंत नागरिकांनी कर भरण्यासाठी गर्दी केली होती.
कर वसुलीत घरपट्टी विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सव्वा दोन कोटी वसूल झाले होते. तर त्यानंतर तासभरात ५० लाखाची वसुली झाली. सायंकाळी सात वाजेपर्यंत घरपट्टी विभागाकडे तब्बल एक कोटी ९४ लाख रुपये जमा झाले होते, तर पाणीपट्टीचे ५५ लाख, नगररचनाचे ३० लाख ८५ हजार, तर मालमत्ता करापोटी ९ लाख ५८ हजार रुपये, तर एलबीटीपोटी १६ लाख ३८ हजार पालिकेच्या तिजोरीत जमा झाले. सांगलीतील नागरी सुविधा केंद्रांवर ५६ लाख ६१ हजार, स्टेशन चौकातील घरपट्टी विभागात १ कोटी ३५ लाख, पाणीपुरवठा विभाग सांगलीकडे ३० लाख ६१ हजार, महावीर उद्यान केंद्रावर १६ लाख ६० हजार, कुपवाड विभागीय कार्यालयात २४ लाख ७६ हजार, मिरज विभागीय कार्यालयात ३४ लाख ८ हजार, मिरज पाणीपुरवठा केंद्रावर ८ लाख ३९ हजार रुपयांचा कर जमा झाला होता.
शासनाचा पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय पालिकेच्या पथ्यावर पडला आहे. (प्रतिनिधी)
बनावट नोटाही आढळल्या
पालिकेकडून नोटांची तपासणी करण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. पहिल्यांदा नोटा तपासणी झाल्यानंतर कर भरण्याच्या टेबलावर जाऊन पैसे जमा करण्याचे नियोजन केले होते. काही नागरिकांकडील पाचशे व हजार रुपयांच्या बनावट नोटाही आढळून आल्या. पण संबंधित नागरिकांना त्या बनावट असल्याचीच माहिती नसल्याने वादावादीचे प्रसंगही उद्भवत होते. बनावट नोटेवर लाल रंगाने खूण केली जात होती.
तशी सूचनाही पैसे स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. त्यामुळे लाल रंगाची खूण असलेल्या नोटा पालिकेने स्वीकारल्या नाहीत.
कार्डने करा खरेदी
बँकांमध्ये ग्राहकांची एकदमच गर्दी झाल्याने चलनाचा तुटवडा निर्माण झाल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. चलन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईपर्यंत ग्राहकांनी रोख रकमेऐवजी क्रेडिट, डेबिट कार्डचा वापर करून व्यवहार करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील सर्व मॉल्स, कापड, किराणा दुकाने, पेट्रोलपंप, हॉटेलमध्येही कार्ड स्वीकारण्यात येत असल्याने ग्राहकांनी याचा वापर करत सहकार्य करावे. इतर व्यवहारासाठी सुरक्षितपणे आॅनलाईन पध्दतीनेही व्यवहार करावेत, जेणेकरून बॅँकेवरील ताण थोडाफार कमी होणार आहे.