आयुक्तांच्या घरी पालिकेचे कर्मचारी
By Admin | Updated: August 4, 2015 23:33 IST2015-08-04T23:33:12+5:302015-08-04T23:33:12+5:30
महापौरांचे स्टिंग आॅपरेशन : ४४ कर्मचारी गैरहजर; ५४ जणांची पगारकपात

आयुक्तांच्या घरी पालिकेचे कर्मचारी
सांगली : महापालिकेचे आयुक्त अजिज कारचे यांच्या गुलमोहर कॉलनीतील बंगल्यावर त्यांच्या अनुपस्थितीत महापालिकेचे तीन कर्मचारी त्याठिकाणी राबत होते. महापौर विवेक कांबळे यांनी मंगळवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये ही बाब उजेडात आली. या मोहिमेत विविध विभागांचे ४४ कर्मचारी गैरहजर असल्याचे तसेच १0 कर्मचारी ओळखपत्राशिवाय काम करीत असल्याचे निदर्शनास आले. या सर्व कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कपात करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या बेशिस्तपणाचे दर्शन महापौरांनी केलेल्या स्टिंग आॅपरेशनवेळी दिसून आले. त्यांनी काही नगरसेवक व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोबत घेऊन विविध विभागांची झाडाझडती घेतली. अनेक कर्मचारी हजेरी लावून गायब झाल्याची बाब समोर आली. कोणतीही पूर्वसूचना न देता अनेकजण गैरहजर होते. काहींनी ओळखपत्र जवळ बाळगले नव्हते. नियुक्तीच्या ठिकाणी काम न करता काहीजण फिरत असल्याचेही दिसून आले. अशा सर्व कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची यादी महापौरांनी तयार करण्यास सांगितली. त्यानुसार ५४ कर्मचारी विविध कारणांनी कारवाईस पात्र ठरले आहेत. त्यांचा एक दिवसाचा पगार कपात करण्याची सूचना महापौरांनी दिली आहे.
महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात काम करणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांची माहितीही या मोहिमेमधून महापौरांना मिळाली. त्यांनी याबाबत कामगार अधिकारी व प्रशासन अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. आयुक्त मुंबईला गेले असताना त्यांच्या अनुपस्थितीत महापालिकेचे कर्मचारी त्यांच्या बंगल्यावर कशासाठी थांबले होते? महापालिकेचे कर्मचारी त्यांच्या खासगी कामासाठी आहेत का?, असा सवालही त्यांनी केला. त्यावर अधिकारी निरुत्तर झाले होते. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. कारवाई झालेले कर्मचारी पुन्हा गैरहजर राहिले, तर त्यांच्या विभाग प्रमुखांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. (प्रतिनिधी)
अधिकारीही गैरहजर
कर्मचाऱ्यांबरोबरच नगरअभियंता आर. पी. जाधव व एच. ए. दीक्षित हेसुद्धा गैरहजर होते. त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी यावेळी दिले.
घरपट्टी विभागातील तीन महिला कर्मचाऱ्यांनी एप्रिलपासून हजेरीपुस्तकावर स्वाक्षऱ्याच केल्या नसल्याची बाब या मोहिमेतून समोर आली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवरही कारवाईचे आदेश देण्यात आले.
कारवाई झालेले महापालिकेचे कर्मचारी
विभाग कर्मचारी संख्या
नगरसचिव २
सुवर्ण जयंती योजना३
मागासवर्गीय समिती६
लेखा विभाग ६
ड्रेनेज १
यंत्रशाळा १
पाणीपुरवठा १९
घरपट्टी १६