महापालिका आयुक्त उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:21 IST2021-07-17T04:21:55+5:302021-07-17T04:21:55+5:30
ओळी :- कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे यांनी रस्त्यावर उतरून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ...

महापालिका आयुक्त उतरले रस्त्यावर
ओळी :- कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे यांनी रस्त्यावर उतरून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यात नागरिकांकडून कोरोना नियमांना हरताळ फासला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनंतर महापालिकेनेही कारवाईचा बडगा उगारला आहे. आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे यांनी शुक्रवारी रस्त्यावर उतरून गर्दीच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली.
गेल्या तीन महिन्यांपासून महापालिका क्षेत्रातील कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नाही. दररोज दीडशेहून अधिक रुग्ण सापडत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजनाही केल्या तरीही नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठ, भाजीमंडईत अजूनही गर्दी कायम आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने, हाॅटेलला घरपोच सेवा देण्याची सूचना असतानाही या आस्थापनाच्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची संख्या कमी नाही. सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला आहे.
शुक्रवारी आयुक्त कापडणीस यांच्यासह महापालिकेचे पथक रस्त्यावर उतरले होते. मुख्य बाजारपेठेत विनामास्क फिरणाऱ्या दहा नागरिकांवर कारवाई करण्यात आली तर एका चहाच्या दुकानदारालाही दंड करण्यात आला. शहरातील चौकाचौकांत स्वच्छता निरीक्षकांची पथके तैनात केली आहेत. या कारवाईत आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, सहायक आयुक्त अशोक कुंभार, सावता खरात, दिलीप घोरपडे, दत्तात्रय गायकवाड यांच्यासह स्वच्छता निरीक्षकांनी भाग घेतला.
चौकट
बेकरी, दोन मंगल कार्यालयांना दंड
कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने सांगलीतील बेकरी आणि दोन मंगल कार्यालयांवर भरारी पथकाने दंडात्मक कारवाई केली. यामध्ये सांगलीवाडीतील फल्ले मंगल कार्यालय आणि शुभमंगल गार्डन मंगल कार्यालय यांनी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल प्रत्येकी दहा हजार, तर बसस्थानक परिसरातील अय्यंगार बेकरीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याबद्दल एक हजार रुपयांचा दंड करण्यात आला.