मुंबई, पुण्याच्या प्रवाशांची होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:25 IST2021-04-06T04:25:58+5:302021-04-06T04:25:58+5:30
सांगली : मुंबई, पुण्यासह परगावाहून महापालिका क्षेत्रात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याची सूचना आरोग्य यंत्रणेला दिली आहे. बसस्थानक, रेल्वेस्थानकासह सार्वजनिक ...

मुंबई, पुण्याच्या प्रवाशांची होणार तपासणी
सांगली : मुंबई, पुण्यासह परगावाहून महापालिका क्षेत्रात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याची सूचना आरोग्य यंत्रणेला दिली आहे. बसस्थानक, रेल्वेस्थानकासह सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या ठिकाणी प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जाणार आहे. त्यात कोविड लक्षणे दिसून आल्यास त्याला तात्काळ महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाणार असल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सोमवारी सांगितले.
कापडणीस म्हणाले की, महापालिका क्षेत्रात वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मिरज पॉलिटेक्निक येथे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. सध्या या सेंटरमध्ये ३८ रुग्ण आयसोलेट झाले आहेत. वाढती रुग्णसंख्या पाहता सांगलीतील दुधनकर आणि वाळवेकर यांना कोरोना रुग्णालय म्हणून मान्यता दिली आहे. सध्या महापालिका क्षेत्रात ७ खासगी रुग्णालयांत कोरोनांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार केले जाणार आहेत. कोविड केअर सेंटरसाठी ४० परिचारिका आणि सहायकांची नियुक्ती केली जाणार आहे. रुग्णासाठी महापालिकेकडून रुग्णवाहिका केंद्र सुरू केले आहे. भविष्यात आणखी सीसीसी केंद्र सुरू करण्याबाबत महापालिकेने तयारी केली आहे, तसेच आणखी खासगी कोविड हॉस्पिटलला परवानगीही देण्याची आमची तयारी आहे.
मुंबई, पुण्यासह परगावाहून महापालिका हद्दीत येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी बसस्थानक, रेल्वेस्थानकासह सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या ठिकाणी तपासणी केंद्रे सुरू करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत. आठवडी बाजार, तसेच सार्वजनिक रस्त्यावरील भरणारे बाजार यापूर्वीच बंद करण्यात आले आहेत. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी सहायक आयुक्तांची चार पथके, एक रॅपिड फोर्स कार्यरत आहे. नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करावे, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही आयुक्त कापडणीस यांनी दिला.