नेर्लेच्या पडिक जागेत साकारतेय बहुउद्देशीय सभागृह
By Admin | Updated: September 1, 2014 23:08 IST2014-09-01T22:21:03+5:302014-09-01T23:08:24+5:30
लोकवर्गणीतून काम : श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान ट्रस्टचा उपक्रम

नेर्लेच्या पडिक जागेत साकारतेय बहुउद्देशीय सभागृह
अवधुत कुलकर्णी - नेर्ले -नेर्ले (ता. वाळवा) येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान ट्रस्टच्यावतीने विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या पडिक जागेत ३३०० चौरस फुटाचे बहुउद्देशीय सभागृह (मल्टीपर्पज हॉल) तयार केले जात आहे. यासाठी ट्रस्टच्या १३ सदस्यांनी प्रत्येकी २५ हजार रुपये जमा केले, शिवाय लोकवर्गणीतून मिळालेल्या रकमेतून ५० टक्के काम पूर्ण झाले आहे.
येथील १२ गुंठे क्षेत्रात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पुरातन मंदिर आहे. ५० वर्षांपूर्वी मंदिरासमोर दुमजली मंडप होता. या मंडपामध्ये भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होत. कालांतराने येथे शाळा भरवली जात होती. काही वर्षांनी दुर्लक्ष होत गेल्याने मंदिराची पडझड झाली. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले. परिसराची दुरवस्था पाहून बँकेमधून निवृत्त होऊन गावी आलेल्या मुकुंद कुलकर्णी यांनी विलास कुलकर्णी, गोविंद कुलकर्णी, कमलाकर जोशी, वासुदेव जोशी, विलास जोशी यांना एकत्र करून मंदिराच्या जीर्णोध्दाराचा निर्णय घेतला. लोकवर्गणीतून शिखरासह नवीन मंदिर बांधण्यात आले. मंदिरापुढे छोटा मंडपही उभारण्यात आला. जुन्या मंदिरातील मूर्तींची नव्या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली.
मुकुंदराव कुलकर्णी, विलास कुलकर्णी यांचे आकस्मिक निधन झाले. यामुळे मंदिराच्या उर्वरित जीर्णोध्दाराचे काम ठप्प झाले. हे काम नुसते थांबले नाही, तर पुन्हा एकदा या परिसराची दुर्दशा झाली. यामध्ये १० ते १२ वर्षांचा काळ लोटला. २०१० मध्ये अवधूत कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ब्राह्मण समाजातील ज्येष्ठ मंडळी व तरुण एकत्र आले. त्यांनी मंदिर परिसराचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सर्व जोशी बंधूंनी ही १२ गुंठे जागा दान दिल्यामुळे त्यातून श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान ट्रस्टची स्थापना करण्यात आली. जागा सपाटीकरण करून कुंपण घालण्यात आले. विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. पाण्यासाठी राजारामबापू इंडोमेंट ट्रस्टने कूपनलिकेची सोय उपलब्ध केली.
घरगुती कार्यक्रम, विवाह समारंभासाठी गावात अत्यल्प दरात सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी ट्रस्टने बहुउद्देशीय सभागृह उभारण्याचा निर्णय घेतला. २५ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. ओम गुरुदेव माऊलींच्या मार्गदर्शनाने या कामाला प्रारंभ झाला. त्यांनी इंदौर येथील उद्योजक अमित सांकला यांना बोलावून डिझाईन तयार करून घेतले आहे.