विट्यात महावितरण कर्मचाऱ्यांची गाढवावरून धिंड काढण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:27 IST2021-03-23T04:27:32+5:302021-03-23T04:27:32+5:30
विटा : थकीत बिलाच्या वसुलीसाठी वीज कनेक्शन तोडले जात असल्याने संतप्त झालेल्या नागरिक व शेतकऱ्यांनी येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा ...

विट्यात महावितरण कर्मचाऱ्यांची गाढवावरून धिंड काढण्याचा प्रयत्न
विटा : थकीत बिलाच्या वसुलीसाठी वीज कनेक्शन तोडले जात असल्याने संतप्त झालेल्या नागरिक व शेतकऱ्यांनी येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी गाढवांना कार्यालयाच्या आवारात घुसवून कर्मचाऱ्यांना गाढवावर बसवून त्यांची धिंड काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला.
महावितरणच्या विटा विभागीय कार्यालयात मनमानी कारभार सुरू असल्याची तक्रार आहे. वीजबिल थकबाकी भरण्यासाठी ग्राहकांची वीज खंडित करण्याचे काम सुरू आहे. मात्र, मोठ्या थकबाकीदारांना अभय दिले जात असून, तोडलेली कनेक्शन पूर्ववत जोडण्यासाठी हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी ११.३० डायमंड ग्रुपचे अध्यक्ष शंकर मोहिते, फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष विजय पाटील, नगरसेवक दहावीर शितोळे यांच्या नेतृत्वाखाली वीजग्राहकांनी महावितरण कार्यालयावर गाढवे घेऊन धडक मारली.
त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
वीज कनेक्शन तोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोलवा, त्यांची गाढवावरून धिंड काढू, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला.
कारभार सुधारला नाही तर तोंडाला काळे फासण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.