महावितरणने पाच महिन्यांत ३५१ वीजचोरांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:31 IST2021-09-14T04:31:07+5:302021-09-14T04:31:07+5:30
सांगली : वीजचोरी विरोधातील मोहिमेअंतर्गत महावितरणने गेल्या पाच महिन्यांत ३५१ वीजचोरांना पकडले. त्यांच्याकडून २२ लाख ५२ हजार रुपयांची दंडवसुली ...

महावितरणने पाच महिन्यांत ३५१ वीजचोरांना पकडले
सांगली : वीजचोरी विरोधातील मोहिमेअंतर्गत महावितरणने गेल्या पाच महिन्यांत ३५१ वीजचोरांना पकडले. त्यांच्याकडून २२ लाख ५२ हजार रुपयांची दंडवसुली केली आहे. विजेच्या चोरीविरोधात महावितरणने आक्रमक पावले उचलायला सुरुवात केली आहे. पुणे विभागीय प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या आदेशानुसार सर्व जिल्ह्यांत प्रत्येक शनिवारी वीजचोरीविरोधात मोहीम राबवली जात आहे. त्याला चांगले यश मिळाले आहे. एप्रिलपासून आजवर ३५१ वीजचोऱ्या उघडकीस आणण्यात महावितरणच्या पथकांना यश आले. मीटरमध्ये फेरफार करणे, मीटर चुकवून वीजवाहिनी जोडणे, मीटरमध्ये सेन्सर बसवून रिमोटद्वारे मीटर थांबवणे असे प्रकार आढळले. थेट वीजवाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीचे प्रकार ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात आढळले. याद्वारे १ लाख ४९ हजार ३१७ युनिट विजेची चोरी करण्यात आली. भरारी पथकांनी वीजचोरांकडून विजेचे शुल्क आणि दंड अशी २२ लाख २२ हजार रुपयांची वसुली केली.
विजेचा वापर भरपूर असतानाही बिल मात्र मोजकेच येणाऱ्या ग्राहकांवर पथकाने लक्ष ठेवले आहे. यातूनच माधवनगरमधील साडेचार कोटी रुपयांची वीजचोरी उघडकीस आली. कार्यकारी अभियंता विनायक इदाते यांनी सांगितले की, विजेची जोडणी तत्काळ मिळत असल्याने ग्राहकांनी वीजचोरीच्या मार्गावर जाऊ नये.