वीज कनेक्शन तोडल्यास महावितरणला न्यायालयात खेचणार : श्रीदास हाेनमाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:30 IST2021-08-28T04:30:39+5:302021-08-28T04:30:39+5:30
देवराष्ट्रे : महावितरण कंपनीने गेल्या सात वर्षांत शेतीपंपाचे कोणतेही रीडिंग घेतलेले नाही. महावितरणच्या नियमानुसार ज्या मीटरचे रीडिंग घेतलेले ...

वीज कनेक्शन तोडल्यास महावितरणला न्यायालयात खेचणार : श्रीदास हाेनमाने
देवराष्ट्रे : महावितरण कंपनीने गेल्या सात वर्षांत शेतीपंपाचे कोणतेही रीडिंग घेतलेले नाही. महावितरणच्या नियमानुसार ज्या मीटरचे रीडिंग घेतलेले नाही ते बिल अनिवार्य नाही, तसेच ट्रान्स्फॉर्मर जळाल्यास किंवा बंद असल्यास किंवा डीपीतील फ्यूज गेल्यास ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रतितास ५० रुपये ग्राहकास देणे बंधनकारक आहे. मात्र, महावितरणने सर्व नियम धाब्यावर बसवून शेतीचा वीजपुरवठा बंद करण्याचा धडाका लावला आहे. नियमबाह्य कनेक्शन तोडल्यास महावितरणला न्यायालयात खेचण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते श्रीदास होनमाने यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
होनमाने म्हणाले, नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी डिपॉझिट सोडून लागणारा सर्व खर्च महावितरण कंपनीने करावा, असा नियम आहे. त्याचबरोबर जीवित हानी झाल्यास, एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास सात लाखापर्यंत नुकसानभरपाई देणे बंधनकारक आहे. मात्र, महावितरण ग्राहकाच्या बाजूचे कायदे केराच्या टोपलीत टाकून हुकूमशाही पद्धतीने शेती पंपाचे कनेक्शन तोडत आहे.
शेती पंपाचे बिल भरण्यास आम्ही नाही म्हणणार नाही; पण महावितरणने नियमानुसार शेतकऱ्यांना डांबाचे व ट्रान्स्फॉर्मरचे भाडे देण्यास सुरुवात करावी. मीटरचे योग्य रीडिंग घेऊन अचूक बिल द्यावे. कनेक्शनसाठी लागणारे सर्व साहित्य महावितरण कंपनीने स्वतः द्यावे. मगच वसुलीचा तगादा लावावा; अन्यथा सांगली जिल्ह्यामध्ये सर्वत्र तीव्र आंदोलन उभे करू.