खासदारांच्या एकाधिकाराला तडे

By Admin | Updated: September 10, 2016 00:41 IST2016-09-09T23:12:25+5:302016-09-10T00:41:36+5:30

तासगावातील चित्र : भाजपांतर्गत सत्तासंघर्ष; निवडणुकीच्या तोंडावर नाराजी

MPs split up | खासदारांच्या एकाधिकाराला तडे

खासदारांच्या एकाधिकाराला तडे

 दत्ता पाटील== तासगाव -खासदार संजयकाका पाटील यांच्या नगरपालिकेतील सत्तेला काही महिने पूर्ण होण्याआधीच गटबाजीचे ग्रहण लागले. गुरुवारी नगराध्यक्षांचे नाव जाहीर होण्यापासून ते राजीनामा नाट्यापर्यंतच्या घडामोडी पाहिल्यानंतर, खासदारांच्या एकाधिकारशाहीला पहिल्यांदाच राजकीय गटबाजीचे तडे गेल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या तोंडावर झाकली मूठ ठेवण्यासाठी प्रयत्न होऊनदेखील, ते प्रयत्न अपयशी ठरल्याचे दिसून आलेच, किंबहुना राष्ट्रवादीकडून अर्ज भरण्याच्या तिरकस चालीवरुन, भाजपांतर्गत सत्तासंघर्ष टोकाला गेल्याचेही स्पष्ट झाले आहे.
खासदार संजयकाका पाटील यांनी राजकारणात एन्ट्री केल्यापासून, अपवाद वगळता सामान्य कार्यकर्त्यांचा मोठा गट त्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे. खासदार होईपर्यंत खासदार गटाची बहुतांश वाटचाल सत्तेबाहेरच राहिली. तोपर्यंत तरी संजयकाकांचा शब्द त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अंतिमच होता. मात्र सत्तेत आल्यानंतर अनेक वर्षे सत्तासंघर्ष केलेल्या कार्यकर्त्यांना सत्तेचा मोह आवरता येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातूनच गटबाजीचे चित्र निर्माण झाले. त्यामुळेच खासदारांच्या एकाधिकारशाहीला तडा गेला. गटबाजीची बाधा, सत्तेवर स्वार झाल्यानंतर भाजपमध्येही दिसून येत आहे. खासदारांना त्यासाठी कसरत करावी लागत असल्याचेही चित्र आहे.
तासगाव नगरपालिकेत सत्तेत आल्यापासून भाजपचे तीन नगराध्यक्ष झाले. चौथ्यांदा नगराध्यक्ष निवडीसाठी जाहीर झालेले नाव भाजपच्या गोटात धक्कादायक मानले जात आहे. किंंबहुना स्पर्धेत असणाऱ्या अनिल कुत्ते यांनीच स्वत: खासदारांनी माझेच नाव असल्याचे सांगितले होते. तसेच रथोत्सवाच्या कार्यक्रमात देखील पटवर्धनांनीदेखील कुत्तेंचा उल्लेख भावी नगराध्यक्ष असाच केला होता. मात्र फासे फिरविताना खासदारांनी आगामी निवडणुकीतील धोका लक्षात घेऊन निर्णय घेतल्याची चर्चा आहे. राजू म्हेत्रे यांच्या पाठीशी नगरसेवकांचे पाठबळ जास्त होते. याउलट कुत्तेंच्या पाठीशी मोजकेच नगरसेवक होते. त्यामुळे संजयकाकांनी म्हेत्रेंच्या बाजूने निर्णय घेतल्याची चर्चा आहे. एका गटाची नाराजी थोपवत असताना, नाराज झालेल्या दुसऱ्या गटातील चार नगरसेवकांनी संजयकाकांकडे नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे या नाराजीनाट्यात भरच पडली. निवडणुकीच्या तोंडावर ही नाराजी भाजपला परवडणारी नाही.
काही महिन्यांतच भाजपमध्ये सुरु झालेले कलह राष्ट्रवादीसाठी गुदगुल्या करणारे ठरत आहेत. भाजपअंतर्गत नाराजीचा फायदा घेण्यासाठी, अल्पमतात असूनदेखील राष्ट्रवादीकडून अर्ज भरण्यात आला आहे.
भाजपच्या काही नाराजांसाठी राष्ट्रवादीने गळ टाकल्याचीही चर्चा आहे. भाजपकडे नगरपालिकेपासून ते केंद्रापर्यंत सत्ता आहे. खासदारांसारखे जिल्हाव्यापी नेतृत्व आहे. मात्र केवळ कारभाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे भाजपचे सत्ताकेंद्र डळमळीत झाले आहे. वेळीच इलाज केला नाही, तर भाजपला त्याची किंमत मोजावी लागणार आहे.++


राष्ट्रवादीच्या अर्जाचे गुपित काय?
भाजपमध्ये बाबासाहेब पाटील, अविनाश पाटील यांच्या नगराध्यक्ष निवडीवेळीदेखील नाराजीनाट्य रंगले होते. त्यावेळीही गटबाजी चव्हाट्यावर आली होती. मात्र त्यावेळची गटबाजी पक्षांतर्गत मर्यादित राहिली होती. मात्र यावेळी एक नवीनच समीकरण उदयाला येणार, अशी चर्चा होती. भाजपमधील एक गट नाराज झाल्यास, या नाराज गटाकडून ऐनवेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन, मला नाही, तर तुलाही नाही, अशा पध्दतीचे समीकरण चर्चेतून रंगविण्यात आले होते. यापूर्वी गटबाजी असूनदेखील नगराध्यक्ष निवडीवेळी राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करण्यात आला नव्हता. यावेळी मात्र अर्ज दाखल केल्यामुळे भाजपच्या एका गटाने राष्ट्रवादीशी छुपे संधान साधल्याची चर्चा होत आहे.


नाराजीनाट्याने अडचण
राजू म्हेत्रे यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी जाहीर झाल्यानंतर चार नगरसेवकांनी संजयकाकांकडे राजीनामे दिले. हे सर्व नगरसेवक खासदारांशी निष्ठा असलेले आहेत. मात्र नाराजी दूर झाली नाही, तर राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाला रसद मिळू शकते. नगराध्यक्षपद न मिळालेल्या कुत्तेंची उपनगराध्यक्ष पदावर बोळवण केली जाण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.

Web Title: MPs split up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.