ग्रामपंचायत निवडणुकीत खासदारांची दडपशाही
By Admin | Updated: November 1, 2015 00:02 IST2015-10-31T23:39:42+5:302015-11-01T00:02:55+5:30
सुमनताई पाटील : राष्ट्रवादीच्या बाजूने एकतर्फी निवडणुका होण्याचा विश्वास

ग्रामपंचायत निवडणुकीत खासदारांची दडपशाही
तासगाव : तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्याकडून दडपशाहीचा एककलमी कार्यक्रम सुरु आहे. मात्र काही गावांत दुसऱ्या पक्षांच्या कुबड्या घेऊन त्यांना निवडणूक लढवावी लागत असल्याची टीका राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांनी पत्रकार बैठकीत केला. आर. आर. आबांच्या विचाराने या निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवल्या जात असल्याने, त्यांचा निकाल आमच्या बाजूने एकतर्फीच असेल, असा विश्वासही यावेळी आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
खासदारांना तालुक्यावर वर्चस्व मिळवायचे आहे. त्यासाठी त्यांच्याकडून दडपशाहीचे राजकारण सुरु आहे. मात्र त्यांना सिध्देवाडी, सावळज, कवठेएकंद, विसापूर, पेड यासह काही गावांत स्वबळावर पॅनेल लावता आलेले नाही. अन्य पक्षांच्या कुबड्या घेत भाजपकडून निवडणूक लढवली जात आहे. बाजार समिती हाणामारीचा प्रकार केला. तरीही त्यावेळी मतदारांनी राष्ट्रवादीच्या पारड्यात स्पष्ट बहुमत टाकले. यावेळीही ग्रामपंचायत निवडणुकांचा कल राष्ट्रवादीच्या बाजूने असून, ३० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींत राष्ट्रवादीला यश मिळेल, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
योजनेते थकित वीजबिल भरण्यासाठी राष्ट्रवादीच्या पाच जिल्हा परिषद सदस्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांचा निधी देण्याबाबत पत्र सादर केले आहे. याउलट खासदार समर्थक जिल्हा परिषद सदस्यांनी मात्र निधी दिला नाही. पुणदी योजनेचे पाणी लोढे तलावात सोडून परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याऐवजी स्वत:च्या शेतीला पाणी मिळावे, यासाठीच नियोजन केले. आबांचे नगरपालिकेतील छायाचित्र काढून स्वत:ची बौध्दिक कुवत दाखवून दिली आहे. त्यामुळे खासदारांचा खरा चेहरा जनतेसमोर आला असून, विकासाच्या जोरावर राष्ट्रवादीची बहुतांश ग्रामपंचायतीत सत्ता असेल, असा विश्वास यावेळी आमदार सुमनताई पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील, संचालक जयसिंग जमदाडे, रवी पाटील, तालुकाध्यक्ष हणमंत देसाई, युवराज पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आता श्रेयासाठी पुढे...
आर. आर. आबांनी जिवाचे रान करुन विसापूर-पुणदी उपसा सिंचन योजना सुरु केली. त्यावेळी विरोधकांकडून ही योजना कुचकामी असल्याचा आरोप होत होता. आता हेच खासदार योजनेसाठी सुरु केलेल्या पाण्याचे श्रेय घेण्यासाठी आटापिटा करत आहेत. या योजनेचे श्रेय आबांना मिळू नये, यासाठी डाव खेळला जात आहे. परंतु सामान्य जनतेला ही योजना आबांचीच असल्याचे ठाऊक आहे.