खासदारांच्या कारखान्याची थकीत बिले अखेर जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:29 IST2021-09-22T04:29:54+5:302021-09-22T04:29:54+5:30
सांगली : थकीत उसाच्या बिलापोटी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर, अखेर खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखालील तासगाव व नागेवाडी साखर ...

खासदारांच्या कारखान्याची थकीत बिले अखेर जमा
सांगली : थकीत उसाच्या बिलापोटी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर, अखेर खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखालील तासगाव व नागेवाडी साखर कारखान्याची बिले मंगळवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली.
तासगाव, नागेवाडी साखर कारखान्याची ऊसबिले गेल्या सात ते आठ महिन्यांपासून थकीत आहेत. ती बिले मिळावीत, म्हणून प्रथम एप्रिलमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले होते. त्यावेळी खासदार संजयकाका पाटील यांनी एका महिन्यात बिले देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, महिन्यात बिले दिली नाहीत, म्हणून पुन्हा ७ जून आणि २० जून रोजी तासगाव येथे खासदारांच्या कार्यालयासमोर संघटनेने आंदोलन केले होते. संजयकाका पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर तीन दिवस ठिय्या आंदोलन, मोर्चा काढण्यासह ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात आले होते. मुंडण आंदोलन करून बिले न देण्याच्या धोरणाचा निषेधही केला होता.
वारंवार या प्रश्नी आंदोलन करूनही बिले देण्यास कारखाना प्रशासनाने टाळाटाळ केली होती. प्रतीकात्मक धनादेश दिल्यानंतरही त्यातून काहीही साध्य झाले नाही. ११ सप्टेंबर रोजीच्या मोर्चाच्या वेळी ७ कोटी रुपयांचे धनादेश शेतकऱ्यांना दिले होते. हे धनादेश वठून मंगळवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले. थकीत बिले जमा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. जिल्ह्यातील अन्य कारखान्यांनी वेळेत बिले दिली असताना, या दोन कारखान्याच्या बिलांसाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागला.
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले की, आतापर्यंत शेतकऱ्यांची २० ते २२ कोटींची ऊसबिले शेतकऱ्यांना दिली आहेत. अद्यापही काही शेतकऱ्यांना ऊसबिले मिळायची आहेत, त्यामुळे त्यांचीही बिले तातडीने द्यावीत, जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
चौकट
संघटनेच्या रेट्यापुढे गुडघे टेकले
खराडे म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रेट्यापुढे साखर सम्राटांना गुडघे टेकावे लागले. तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकीत ऊसबिलासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. यापुढेही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढत राहू.