रस्त्यांसाठी चिमुकल्यांचे आंदोलन
By Admin | Updated: June 15, 2015 00:20 IST2015-06-15T00:01:36+5:302015-06-15T00:20:07+5:30
शाळेकडे जायचे कसे? : आमदारदादा, खासदारकाका रस्ता करा

रस्त्यांसाठी चिमुकल्यांचे आंदोलन
सांगली : आमदारदादा, खासदारकाका, आयुक्तमामा, नगरसेवकतात्या रस्ता करा, अशी साद घालत रविवारी शामरावनगर, महसूल कॉलनीतील शाळकरी मुलांनी अनोखे आंदोलन केले. सोमवारपासून शाळा सुरू असून, शाळेकडे जाणारेच रस्ते चिखलमय झाले आहेत. अशा रस्त्यावरून शाळेकडे जायचे कसे? असा सवालही मुलांनी केला.
सोमवारपासून या चिखलातून शाळेला जावे लागणार आहे. रविवारी शामरावनगर, महसूल कॉलनीतील शाळकरी मुले, पालक यांनी राष्ट्रवादीचे संदीप दळवी यांच्या नेतृत्वाखाली अनोखे आंदोलन केले. आमदारदादा, खासदारकाका, नगरसेवकतात्या, आयुक्तमामा रस्ता करा, असे फलक घेऊन या मुलांनी फेरी काढली. मुलांचे हे आंदोलन दिवसभर चर्चेत होते. (प्रतिनिधी)
खोदलेल्या रस्त्यांवर चालणेही कठीण
शामरावनगर परिसरातील रस्ते ड्रेनेज व पाणी पाईपलाईनसाठी खोदले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून या चरी मुरूम, खडीने मुजविलेल्या नाहीत. याबाबत पंधरा दिवसांपूर्वी नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढला होता. तरीही चरी मुजविण्याचे काम झाले नाही. त्यात दोन दिवसांपूर्वी शहरात झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण परिसर चिखलमय झाला आहे. ठिकठिकाणी पाणी साचले आहे. या रस्त्यावर चालणेही मुश्किलीचे झाले आहे.