व्यवसाय सुरू करू न दिल्यास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST2021-04-10T04:26:14+5:302021-04-10T04:26:14+5:30
वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे शासनाने बंद केलेली दुकाने सोमवारपर्यंत सुरू करण्याची परवागी द्यावी, अन्यथा शासनाच्या विरोधात तीव्र ...

व्यवसाय सुरू करू न दिल्यास आंदोलन
वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे शासनाने बंद केलेली दुकाने सोमवारपर्यंत सुरू करण्याची परवागी द्यावी, अन्यथा शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. याबाबत तहसीलदार शैलजा पाटील यांना व्यापाऱ्यांनी निवेदन दिले.
शासनाने अचानक केलेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनतेबरोबर ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांचे हाल सुरू आहेत. कोरोनामुळे गेले १४ महिने वांगी परिसरातील व्यवसायिक अडचणीत आहेत. व्यापाऱ्यांची आर्थिक देणी थांबली आहेत. बँकांची कर्जे आर्थिक वर्षात वेळेवर गेली नाहीत. त्यामुळे आमचा या लॉकडाऊनला विरोध आहे. सुरुवातीला दोन दिवस वगळता सवलत दिली. मात्र, पुन्हा सवयीप्रमाणे राज्य सरकारने यू- टर्न घेतला गेला आहे. याबाबत गांभीर्याने विचार केला नाहीतर व्यापारी प्रचंड अडचणीत येतील. या सर्वांचा विचार करून सर्व परिस्थिती हाताळावी, बंद असणाऱ्या दुकानांना शासनाने वेळेचे बंधन घालून चालू करण्यास परवानगी द्यावी. वांगी परिसरातील सर्व व्यवसाय नियमांचे पालन करून सुरू करण्याबाबत सोमवारपर्यंत तोडगा काढावा, अन्यथा आम्हा सर्व व्यापाऱ्यांना नाईलाजाने शासनाच्या विरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मोहन मोहिते, माजी अध्यक्ष गजानन पोतदार, दीपक सूर्यवंशी, सचिन मोहिते, पवन सूर्यवंशी, श्रीकांत मोहिते, महेश जाधव आदी उपस्थित होते.