सभापती बदलाच्या मिरजेत हालचाली
By Admin | Updated: January 13, 2016 22:37 IST2016-01-13T22:37:47+5:302016-01-13T22:37:47+5:30
पंचायत समिती : दिलीप बुरसे पायउतार होणार

सभापती बदलाच्या मिरजेत हालचाली
मिरज : मिरज पंचायत समितीचे सभापती दिलीप बुरसे यांना सभापतिपदाचा राजीनामा देण्याचे आदेश काँग्रेसच्या नेत्यांनी दिले आहेत. बुरसे यांनीही ठरलेला कालावधी पूर्ण होत असल्याने राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे.
पंचायत समितीत नवीन सभापती निवडीसाठी राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. इच्छुकांनी नेत्यांकडे ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. शेवटचे सव्वा वर्ष राहिल्याने इच्छुकांची संख्या अर्धा डझनावर पोहोचली आहे.
मिरज पंचायत समितीमध्ये काँग्रेसप्रणित मदन पाटील गटाची सत्ता आहे. सभापतीपद सलग पाच वर्षे खुल्या वर्गासाठी आहे. सव्वावर्षाचा कालावधी ठरवून देण्यात आला आहे. सभापती बुरसे यांनाही तेवढाच कालावधी ठरवून देण्यात आला होता. त्यांची मुदत जानेवारीत पूर्ण होत असल्याने इच्छुकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती.
मदन पाटील यांच्या निधनामुळे इच्छुकांनी सभापतींच्या राजीनाम्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांना साकडे घातले होते.
या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक झाली. बैठकीत प्रतीक पाटील यांनी बुरसे यांना राजीनामा देण्याची सूचना केली. बुरसे यांनीही तयारी दर्शविली आहे. या बैठकीस विशाल पाटील, काँग्रेसचे मिरज तालुकाध्यक्ष अमर पाटील, मिरज बाजार समितीचे सभापती अणासाहेब कोरे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
बुरसे यांनी राजीनामा देण्याचा नेत्यांना शब्द दिल्याने, नवीन निवडीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. वेळोवेळी नेत्यांच्या आश्वासनामुळे प्रतीक्षेत असलेले कर्नाळचे प्रवीण एडके प्रमुख दावेदार आहेत. एडके यांच्याबरोबर बामणोलीच्या तेजश्री चिंचकर, सलगरेच्या जयश्री पाटील व म्हैसाळच्या जयश्री कबुरे यांच्यासह अर्धा डझन इच्छुकांनी सभापती पदावर दावा केल्याने, नेत्यांची तारेवरची कसरत होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पंचायत समितीमध्ये विरोधी राष्ट्रवादीचे सात सदस्य आहेत. या गटाने वेळोवेळी सभापती पदासाठी प्रयत्न केले आहेत. यावेळीही हा गट सभापतीपद मिळविण्याच्या तयारीत असून, काँग्रेसच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. (वार्ताहर)
जानेवारीअखेर राजीनाम्याची शक्यता
सभापती दिलीप बुरसे जानेवारीअखेर राजीनामा देण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, काँग्रेसच्या माध्यमातून मला सभापतीपद व बाजार समितीचे संचालकपद मिळाले. पक्षाने दिलेल्या संधीमुळे तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली. सर्वसामान्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. कारकीर्दीवर पूर्णत: समाधानी आहे. पक्षसंघटनात्मक बांधिलकी व नेत्यांचा शब्द प्रमाण मानून सभापतिपदाचा राजीनामा देणार आहे.