नगरसेवकाविरोधात आंदोलन
By Admin | Updated: October 3, 2015 23:47 IST2015-10-03T23:47:14+5:302015-10-03T23:47:14+5:30
मनगू सरगर यांचे सदस्यत्व रद्द करा : पालिका कर्मचाऱ्यांची मागणी; निदर्शने

नगरसेवकाविरोधात आंदोलन
सांगली : महापालिकेचे मुकादम गणपत भालचीम यांना मारहाण करणारे नगरसेवक मनगू सरगर यांचे पद रद्द करा, अशी मागणी शनिवारी महापालिका कामगार सभेच्यावतीने करण्यात आली. या घटनेचा व नगरसेवकाचा निषेध करीत कर्मचाऱ्यांनी महापालिकेसमोर जोरदार निदर्शने केली.
महापालिका कामगार सभेचे सरचिटणीस दिलीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. महापालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. मुकादमास मारहाण करणाऱ्या नगरसेवकाचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे आयुक्तांकडे करण्यात आली. आयुक्तांच्या गैरहजेरीत हे निवेदन प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, मुकादम भालचीम यांची कोणतीही चूक नसताना त्यांना कामावर असताना मारहाण करण्यात आली. सरगर व लेंगरे यांनी मुकादमास मारहाण करून जाणून बुजून शासकीय कामात अडथळा आणलेला आहे. त्यांच्यावर याप्रकरणी कारवाई झाली पाहिजे.
महापालिकेत अत्यंत अपुरा कर्मचारी वर्ग असतानाही उर्वरित कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीत नगरसेवकांची ही कृती शोभनीय नाही. काही नगरसेवक कर्मचाऱ्यांना अत्यंत हीन वागणूक देत आहेत. त्यामुळे या सर्वप्रकरणात लक्ष घालून आयुक्तांनी संबंधित नगरसेवकावर कारवाई करावी. त्यांचे सदस्यत्व रद्द करावे. मारहाणप्रकरणी कोणतीही कारवाई प्रशासकीय स्तरावर झाली नाही, तर संघटनेला नाईलाजास्तव रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी नगरसेवक सरगर यांचा जाहीर निषेधही करण्यात आल्या. आंदोलनात एकनाथ माळी, विकास कांबळे, चिंतामणी कांबळे, बापू कुदळे, नारायण हजारे, गजानन शिंगे, आर. के. यादव आदी कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)