इस्लामपूर : येत्या १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऊस गळीत हंगामातील एफआरपी तीन टप्प्यांत घ्यावी, अशी शिफारस साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केली आहे. त्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी निषेध केला आहे. ही शिफारस मागे न घेतल्यास प्रसंगी पुणे येथे जाऊन साखर आयुक्तांना काळे फासण्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे.
जाधव म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकरकमी एफआरपीचा कायदा लागू करण्यासाठी संघर्ष केला आहे. तो एफआरपीचा कायदा देशाच्या सर्वोच्च सभागृहात पारित करण्यात आला आहे. साखर कारखानदार साखरेला बाजारात दर नाही, असे सांगून शेतकऱ्यांना फसवत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचा दर ३५०० रुपयांवर गेला आहे. उसापासून इथेनॉल, मद्य, स्पिरिट, बगॅस आणि वीजनिर्मिती यातून मिळणाऱ्या पैशाचा हिशेब शेतकऱ्यांना दाखविला जात नाही. शेतकऱ्यांनी तीन टप्प्यांत एफआरपी घ्यावी, त्यामुळे कारखान्यांचे प्रतिटन २०० ते ३०० रुपये व्याज वाचेल, असे मत साखर आयुक्त गायकवाड यांनी व्यक्त केले होते. त्यांनी राजीनामा देऊन एक एकर ऊसशेती करून बघावी, म्हणजे ऊस उत्पादकांचे काय हाल होतात, हे समजेल.
जाधव म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून पूरस्थितीमुळे ऊस उत्पादक देशोधडीला लागला आहे. रासायनिक खतांची दरवाढ न परवडणारी आहे. लागवड ते ऊस तुटेपर्यंत शेतकऱ्यांना विकास सोसायटीचे कर्ज काढून १२ टक्के व्याजदराने शेती करावी लागते. तीन टप्प्यांतील एफआरपीमुळे सोसायटीचे कर्जही भागणार नाही. आत्महत्या करावी लागेल. त्यामुळे गायकवाड यांनी शेतकरीविरोधी वायफळ बडबड बंद करावी.