गणपती पेठेतील जागा सर्वात महाग

By Admin | Updated: January 2, 2015 00:11 IST2015-01-01T23:10:37+5:302015-01-02T00:11:11+5:30

रेडीरेकनर लागू : जागांच्या किमती १५ टक्क्याने महागल्या; मिरज रस्त्यावरील दर स्थिर

The most expensive place for Ganpati Peth | गणपती पेठेतील जागा सर्वात महाग

गणपती पेठेतील जागा सर्वात महाग

अंजर अथणीकर - सांगली -शहरातील रेडिरेकनरच्या अर्थात शासकीय दरामध्ये १५ टक्के वाढ झाली आहे. नवीन दरवाढ आज गुरुवारपासूनच लागू करण्यात आली आहे. त्यानुसार सांगलीमध्ये गणपती पेठेतील जागा सर्वात महागडी ठरली आहे. त्या तुलनेत माधवनगर रस्त्यावरील जागांच्या किमती कमी आहेत.
शासन दरवर्षी एक जानेवारीपासून नवे रेडिरेकनरचे दर जाहीर करते. बाजारभावाच्या दराचा विचार करून रेडिरेकनरचे दर जाहीर केले जातात. त्यानुसार सांगलीतील जागांचे सर्वसाधारण दर यावर्षी पंधरा टक्क्यांनी वाढले आहेत. ही नवीन दरवाढ तात्काळ जाहीरही करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांना याची सूचनाही प्रशासनाने तात्काळ दिली असून, त्याची अंमलबजावणीही आता सुरू झाली आहे.
नव्या शासकीय दरानुसार गणपती पेठेतील जागा सर्वात महागडी ठरली आहे. गणपती पेठेत शासकीय दरानुसार खुली जागा २२ हजार ९० रुपये प्रति चौरस मीटर आहे. सर्वसाधारणपणे गुंठ्याचा दर २२ लाख रुपये झाला आहे. गणपती पेठेतच बांधकाम केलेल्या जागांची किंमत प्रति चौरस मीटर ३६ हजार ९८० रुपये आहे. पहिल्या मजल्याची किंमत ४६ हजार ४५०, तर तळमजल्याची किंमत ६८ हजार २१० रुपये चौरस मीटर आहे.
महापालिका मुख्यालय परिसरात खुली जागा १८ हजार ५५० रुपये, बांधकाम केलेली जागा ३३ हजार ४९० रुपये, वरच्या मजल्याची किंमत ४२ हजार ३२० रुपये व तळमजल्यावरील व्यावसायिक जागेची किंमत ६३ हजार ३४० रुपये आहे.
माधवनगर रस्त्यावर खुली जागा ४ हजार २६० रुपये, बांधकामासह जागा २० हजार ७५० रुपये, वरच्या मजल्याची किंमत २६ हजार १९० रुपये, तर तळमजल्याची व्यावसायिक जागांची किंमत २४ हजार ५६० रुपये आहे. नेमिनाथनगर, गुलमोहर कॉलनीमधील खुली जागा ३ हजार ९० रुपये, बांधकामासाठी निवासी जागा १८ हजार ३६० रुपयांना असून, वरच्या मजल्याची किंमत २३ हजार २०० रुपये आहे. त्याचबरोबर तळमजल्याची व्यावसायिक जागा आता २५ हजार ४८० रुपये झाली आहे.
मिरज रस्त्यावरील जागांना चांगली मागणी असताना, या रस्त्यावरील किमती मात्र वाढल्या नाहीत. सांगली हद्दीतील मिरज रस्त्यावरील खुली जागा ७ हजार ६८० रुपये असून, बांधकाम निवासी जागा २७ हजार २५० रुपये आहे. वरच्या मजल्याचा दर २७ हजार २५० रुपये असून, तळमजल्यावरील व्यावसायिक जागेची किंमत आता ४६ हजार १३० रुपये आहे.


बारा टक्के महसूल मिळणार
शासकीय जागांच्या किमती पंधरा टक्क्यांनी महागल्या असल्या तरी, शासनाला महसूल मात्र बारा टक्के मिळणार आहे. तरीही महसूल मात्र अधिक मिळणार आहे. सांगली शहरामध्ये रोजची दस्त नोंदणी ६० ते ७० होते. आज नवे दर जाहीर झाल्याने ही संख्या आज निम्म्यावर आली होती. जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणच्या जागांच्या किमती कमी-अधिक प्रमाणात वाढविण्यात आल्या आहेत. शासनाचे नवे दर सर्व दुय्यम निबंधक व रजिस्टर कार्यालयांना आज सकाळी कळविण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात आजपासून (गुरुवार) याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.


१ जानेवारीपासून शासन नवीन दरवाढ जाहीर करणार असल्याचे समजताच काल (बुधवार) आॅनलाईन दस्त नोंदणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीदारांनी गर्दी केली होती. ग्रास प्रणाली बंद पडल्याने नागरिकांना काल व्यवहार करता आले नाहीत. त्यामुळे आज त्यांना नव्या दराने खरेदी-विक्री व्यवहार करावे लागले.

Web Title: The most expensive place for Ganpati Peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.