सांगली : गेल्या पंधरवड्यापासून पावसाचे झालेले आगमन आणि ठिकठिकाणी पाणी साचून राहिल्याने शहरासह परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मोकळे प्लाॅट आणि मैदानांमध्ये साचलेल्या सांडपाण्यात डासांची उत्पत्ती वाढत आहे. उपाययोजना म्हणून महापालिकेने धुरळणी व फवारणी करण्याचे काम हाती घेतले आहे. -----
वाजंत्री कलाकारावर उपासमारीची वेळ
सांगली: गेल्यावर्षी पाठोपाठ यंदाही कोरोनामुळे लग्नाचा हंगाम वाया गेल्याने वाजंत्री कलाकार अडचणीत सापडले आहेत. लग्नासह धार्मिक कार्यक्रमही रद्द करण्यात आल्याने या कलाकारांची अडचणी वाढल्या आहेत. शासनाने अनेक दुर्लक्षित घटकाला आर्थिक मदत केली आहे. तशीच मदत या कलाकारांनाही करावी, अशी मागणी होत आहे.
------
सांगलीत मटका घेणाऱ्यावर कारवाई
सांगली : शहरातील बदाम चौक परिसरात मटका घेणाऱ्या एकावर पोलिसांनी कारवाई केली. त्याच्याकडून ४९५ रुपयांचा रोकड जप्त करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कर्मचारी अक्षय नेमगोंडा कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.
-----
सांगलीत जुगार खेळताना चौघांवर कारवाई
सांगली : शहरातील स्टेशन रोडवर असलेल्या एका इमारतीत जुगार खेळत बसलेल्या चौघांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत त्यांच्याकडून ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी झाकीरहुसेन काझी यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
-----
सांगलीत गांजा ओढणाऱ्यास अटक
सांगली : शहरातील राजरत्न कॉम्पलेक्सच्या पाठीमागे गांजा ओढत बसलेल्या तरुणावर एलसीबीने कारवाई केली. त्याच्याकडून २०० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सुहेल कार्तीयानी यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.