मार्निंग वाॅक आरोग्यासाठी की कोरोना घरात आणण्यासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:24 IST2021-05-22T04:24:26+5:302021-05-22T04:24:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला असला तरी नियमांना हरताळ ...

मार्निंग वाॅक आरोग्यासाठी की कोरोना घरात आणण्यासाठी?
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला असला तरी नियमांना हरताळ फासणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यात व्यायामाच्या नावाखाली हजारो नागरिक पहाटेच्या सुमारास मार्निंग वाॅकला घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे मार्निंग वाॅक नेमका आरोग्यासाठी की कोरोना घरात आणण्यासाठी असा प्रश्न पडतो.
ब्रेक द चेन अतर्गंत शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासन व जिल्हा पातळीवर काही निर्बंध लागू करण्यात आले. सुरुवातीच्या काळात निर्बंधाचे पालन करण्याकडे नागरिकांचा कल होता; पण हळूहळू लाॅकडाऊन वाढताच नागरिकही घराबाहेर पडू लागले आहेत. विशेषत: पहाटेच्या सुमारास मार्निंग वाॅकसाठी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मुख्य रस्ते वगळून आडमार्गावरील रस्त्यावर सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी येत आहेत. यात महिला, तरुणीही असतात. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दोन व्यक्तींमधील अंतर सहा फुटांपेक्षा अधिक हवे; पण बहुतांश मार्निंग वाॅक करणारे नागरिक घोळक्याने फिरत असतात. काहीजण सहकुटुंब बाहेर पडतात. यात लहान मुलांचाही समावेश असतो. केवळ पहाटेच नव्हे, तर सायंकाळी, रात्री जेवणानंतरही फिरणाऱ्यांची संख्या कमी नाही. काहीजण आरोग्यासाठी फिरत असल्याचे कारण देतात, तर काहीजण लाॅकडाऊनमुळे घरात बसून कंटाळा आला आहे म्हणून बाहेर पडल्याचे समर्थन करतात. पण, अशाने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचीच शक्यता अधिक आहे. मध्यंतरी महापालिकेने मार्निंग वाॅकसाठी घराबाहेर पडणाऱ्या लोकांची अँटिजन चाचणी केली होती. यात काही नागरिक पाॅझिटिव्ह आढळून आले होते. हा प्रकार पाहता मार्निंग वाॅकला रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
चौकट
पोलिसांकडून सूट
लाॅकडाऊनच्या काळात शहरातील मुख्य रस्त्यावर, चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून गस्तही घातली जात आहे. पण, पहाटेच्या सुमारास पोलीस बंदोबस्त नसल्याचा गैरफायदा घेऊन नागरिक घराबाहेर येत आहेत. मुख्य रस्ते, चौक सोडून आडमार्गावरील रस्त्यावर मार्निंग वाॅक सुरू असतो. काही ठिकाणी नजर चुकवून लोक रस्त्यावरून फिरत असतात. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने तेथील क्रीडांगणावरही दुपारच्यावेळी खेळासाठी गर्दी होत आहे. एकप्रकारे पोलिसांकडून सूट दिल्याचे बोलले जात आहे.
चौकट-
मार्निंग वाॅकची सवय गेल्या दहा वर्षांपासून आहे. लाॅकडाऊनमध्ये आधी घरीच होतो; पण आरोग्यासाठी पहाटेच्या सुमारास घराबाहेर पडत आहे. मोकळ्या हवेत फिरण्यास प्राधान्य देतो. - एक नागरिक
चौकट
कोरोनाच्या काळात शारीरिक फिटनेस राखण्याची गरज आहे. त्यासाठी पहाटेच्या मोकळ्या हवेत फिरल्यास मनालाही आनंद मिळतो. या काळात व्यायाम व पायी फिरणे महत्त्वाचे आहे. - एक नागरिक
चौकट -
खुली हवा नव्हे, कोरोनाचे विषाणू
शुद्ध व खुली हवेसाठी नागरिक पहाटेच्या सुमारास मार्निंग वाॅक करीत आहे. काहीजण ग्रुप करून फिरतात. त्यापैकी एखादा पाॅझिटिव्ह असेल तर त्याचा संसर्ग इतरांनाही होऊ शकतो. हा धोका नागरिक विसरत आहेत.