शासनाचा सहकारात गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप
By Admin | Updated: March 23, 2015 00:44 IST2015-03-23T00:01:19+5:302015-03-23T00:44:23+5:30
जे. एफ . पाटील : संस्था बनल्या राजकारणाचे केंद्र; कुंडलमधील कार्यशाळेमध्ये टीका

शासनाचा सहकारात गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप
कुंडल : सहकार हा चांगला विचार व साधन आहे. सहकाराला पुन्हा उर्जितावस्था आणावयाची असेल तर, प्रत्येक माणसाने आपल्यात चांगला बदल केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी व्यक्त केले.क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत ‘सहकार क्षेत्रापुढील आव्हाने’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही. वाय. पाटील होते. डॉ. पाटील पुढे म्हणाले, गरजेपेक्षा अधिक प्रमाणात सहकार क्षेत्रात सरकारने हस्तक्षेप केला आहे. सहकारी क्षेत्रात भांडवल उभारणीची पद्धत चुकीची आहे. सरकारकडून सहकारी संस्था उभारणीसाठी भांडवल घेऊ नये. सहकारी संस्थांनी ज्या कारणासाठी पैसे वापरावयाचे आहेत, त्यासाठी वापरले नाहीत. सहकारात गरजेपेक्षा जास्त नोकर भरती केली जाते. सहकारी संस्था राजकारणाचे केंद्र बनल्या आहेत. आदी कारणांमुळे सहकार अडचणीत आला आहे. विसरून गेला आहे. क्रांती उद्योग व शिक्षण समूहाचे प्रमुख अरुण लाड म्हणाले, १९९० पासून सहकार बिघडत गेला आहे. सहकारावर शेती अवलंबून आहे. शेतीसाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही. सहकारी संस्था मोडीत निघाल्यास शेतीवर अवलंबून असणारे उद्योग बंद पडतील. सहकार वाचविण्याचे आव्हान आपल्या तरुण पिढीवर आहे.
प्रा. सुभाष दगडे म्हणाले, लोकांमधून सहकारी चळवळीचे नेतृत्व करावयास पाहिजे. सहकारी संस्था विकासाचे एक केंद्र आहे. सहकाराचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींनीच खासगी उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्राचार्य डॉ. प्रताप लाड यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सहसचिव सी. एल. रोकडे, संपतराव पवार, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. आभार एम. जी. सदामते यांनी मानले. डॉ. डी. एम. होनमाने यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)