भाजपकडून सिंचनापेक्षा बुलेट ट्रेनवर अधिक खर्च
By Admin | Updated: May 11, 2016 00:52 IST2016-05-10T22:44:31+5:302016-05-11T00:52:29+5:30
धनंजय मुंडे : जतमध्ये राष्ट्रवादीचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

भाजपकडून सिंचनापेक्षा बुलेट ट्रेनवर अधिक खर्च
जत : जत तालुक्यातील म्हैसाळ जलसिंचन योजनेची कामे पूर्ण करण्यासाठी सातशे कोटींची गरज असताना शासन एक किलोमीटर बुलेट ट्रेन कामासाठी आठशे कोटी रुपये खर्च करत आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी जत येथील सभेत केली. जत तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयासमोरील पोलिस कवायत मैदानावर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाल्यानंतर धनंजय मुंडे बोलत होते. ते म्हणाले की, दुष्काळाची जाणीव मला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातमध्ये शेतकरी आत्महत्या व शेतकऱ्यांचे आर्थिक संकट हे विषय घेतले जात नाहीत. पंतप्रधान व भारतीय जनता पार्टी देशातील जनतेला फसवत आहे. सलग चार वर्षे दुष्काळ आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवलत मिळावी म्हणून आम्ही सतत संघर्ष करत आहे. आतापर्यंत पाच अधिवेशने झाली आहेत, परंतु कर्जमाफी झाली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
दुष्काळ हे नैसर्गिक संकट असले तरी, त्यावर मात करून राज्य शासन उपाय योजना करू शकते, परंतु राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे शासनाने झोपेचे सोंग घेतले आहे. आमच्या दबावामुळे शासनाने टंचाई व त्यानंतर दुष्काळ जाहीर केला आहे. अन्यथा शासनाला दुष्काळ दाबायचा होता. त्यांना कामच करायचे नव्हते, असा आरोप त्यांनी केला. यापुढील काळात जत तालुक्याच्या विकासासाठी निर्णायक संघर्ष असणार आहे. तालुक्यातील प्रलंबित मागण्या येथील शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी आ. जयंत पाटील म्हणाले की, शासन रोज एक नवीन घोषणा करत आहे. परंतु याची अंमलबजावणी करत नाही. पाण्याचा अपुरा पुरवठा होत आहे. त्यामुळे प्रति घागर तीन रुपये असे विकत पाणी घेऊन जनतेला प्यावे लागत आहे.
मजुरांना काम व दाम देण्याची ताकद सरकारमध्ये राहिली नाही. अस्वच्छ पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आघाडी शासन काळात छावणीतील शेणात भ्रष्टाचार झाला म्हणून शासन आमच्यावर आरोप करत आहे. बुद्धिभेद करून आरोप होत आहेत. जाचक अटींमुळे छावणी सुरू करण्यासाठी एकही संस्था पुढाकार घेत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
पक्षाचे तालुका अध्यक्ष अॅड. बी. ए. धोडमणी यांनी स्वागत केले. यानंतर जि. प. अध्यक्षा रेशमाक्का होर्तीकर, आ. सुमनताई पाटील, माजी आमदार प्रकाश शेंडगे, राजेंद्रअण्णा देशमुख, अण्णासाहेब गडदे, रमेश पाटील, ऋषिकेश देशमुख, संजयकुमार सावंत, उत्तम चव्हाण, सुकुमार कांबळे, अॅड. चन्नाप्पा होर्तीकर, शरद लाड यांनी मनोगत व्यक्त केले.
जत नगर परिषद उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, विजय सगरे, आर. के. पाटील, अविनाश वाघमारे, सिद्धाप्पा क्षीरसाड, अॅड्. बाबासाहेब मुळीक, जि. प. सभापती सुनंदा पाटील आदी उपस्थित होते. महादेव पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)
सत्ताधाऱ्यांना : शेतकरी संपवायचा आहे!
शेतकऱ्यांच्या व्यथा आणि दु:ख समजून घेणारा एकही मंत्री अथवा शेतकरी कुटुंबातील मंत्री या मंत्रिमंडळात नाही. त्यामुळे जनतेवर मोठे संकट आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नरेंद्र फडणवीस यांना संपूर्ण शेतकरी वर्ग संपवायचा आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत नाहीत, असा आरोप मुंडे यांनी केला.