सांगलीत दिवसाला तीनशेहून अधिक एचआरसीटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST2021-04-10T04:26:25+5:302021-04-10T04:26:25+5:30
सांगली : कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत असताना, त्यांच्या उपचारावरील ताणही वाढत आहे. कोरोनाच्या अचूक निदानासाठी आरटीपीसीआर, ॲन्टिजेन टेस्ट ...

सांगलीत दिवसाला तीनशेहून अधिक एचआरसीटी
सांगली : कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत असताना, त्यांच्या उपचारावरील ताणही वाढत आहे. कोरोनाच्या अचूक निदानासाठी आरटीपीसीआर, ॲन्टिजेन टेस्ट आवश्यक असल्या तरी पुढील उपचारासाठी उपयोगी ठरणाऱ्या सिटीस्कॅनच्या संख्येतही वाढ होत आहे. सांगली शहरात आठ ठिकाणी एचआरसीटी स्कॅनची सोय असून, तिथे दररोज सरासरी ३०० हून अधिक जणांची तपासणी होत आहे.
कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पाचव्या किंवा सहाव्यादिवशी केलेला एचआरसीटी महत्त्वाचा असतो. फुफ्फुसाच्या डाव्या व उजव्या बाजूला विषाणूचे झालेले संक्रमण ओळखून त्याचा ‘स्कोर’ ठरविला जातो. जितका स्कोर जास्त तितकी जोखीम अधिक असली तरी त्यामुळे रुग्णांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. सांगलीत सध्या आठ ठिकाणी अशी तपासणी केली जात असून, त्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरपत्रकाची अंमलबजावणी होत असल्याचे दिसून आले. एचआरसीटी सोडून इतर सिटीस्कॅन मात्र मशीनच्या क्षमतेनुसार आकारले जात आहेत. मात्र, कोरोनाविषयक तपासणीत शासनाने ठरवून दिलेले दरच आकारलेे जात आहेत.
चौकट
एचआरसीटीत झाली वाढ
सध्या कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे सिटीस्कॅनचेही प्रमाण वाढत आहे. बाधितांपैकी सुमारे ८० टक्के रुग्णांची एचआरसीटी केली जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे गेल्या महिन्यापेक्षा तपासणीसंख्येतही वाढ दिसून आली.
चौकट
सिटीस्कॅन कधीही फायदेशीरच
कोरोना विषाणूचा थेट हल्ला हा फुफ्फुसावर हाेत असल्याने फुफ्फुसाची क्षमता कमी झाली तर ते जिवावर बेतू शकते. त्यामुळे कोरोनाचे निदान झाल्यानंतर पाचव्या, सहाव्यादिवशी केलेला एचआरसीटी पुढील उपचारासाठी उपयोगी पडत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कोट
गेल्यावर्षी कोरोनाबाधितांची संख्या वाढत होती. त्यावेळी एचआरसीटी खूप उपयोगी ठरल होता. आताही पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढत आहेत. गेल्यावर्षीपेक्षा यंदा कोरोना रुग्णांमधील लक्षणे वेगळी आहेत. तरीही त्यांनी एचआरसीटी करून घेणे आवश्यक आहे. त्याच्या वाढत्या स्कोरमुळे घाबरून न जाता वेळीच पुढील उपचार करण्यासाठी ही चाचणी खूपच उपयोगी ठरत आहे.
डॉ. निखिल मेहता, रेडिओलॉजिस्ट, सांगली