सांगलीत शेतकऱ्यांचा ऊस, भाजीपाल्यासह मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:55 IST2021-09-02T04:55:05+5:302021-09-02T04:55:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापुरात झालेल्या शेतीच्या नुकसानीबद्दल शासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर सरकार ...

सांगलीत शेतकऱ्यांचा ऊस, भाजीपाल्यासह मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापुरात झालेल्या शेतीच्या नुकसानीबद्दल शासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर सरकार जागे होणार का, असा सवाल सर्वोदय कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी केला. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सांगलीत मोर्चा काढण्यात आला होता.
पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. येथील स्टेशन चौकातून काँग्रेस भवनपर्यंत जळालेला ऊस, कुजलेला भाजीपाला घेऊन शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हवेत घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष मदत द्यावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
पृथ्वीराज पवार म्हणाले, सरकार निव्वळ नव्या घोषणांचे रतीब घालत आहे. शेतकऱ्यांना प्रतिगुंठा ६५ रुपयांची मदत जाहीर करून थट्टा केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांचा रोष पाहून २०१९ प्रमाणे मदत जाहीर केली. प्रत्यक्ष एक रुपयासुद्धा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. आधीच कोरोनामुळे शेतकरी कोलमडून गेला आहे. नागठाणेतील तरुण शेतकरी, अंकलखोपला दोन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सरकारच याला जबाबदार आहे. मुंबई, पुणे, हैद्राबाद, दिल्लीसारख्या बाजारपेठांत भाजीपाला गेला नाही. महापुराने तर पिके कुजून गेली आहेत. आंदोलनात महावीर चव्हाण, दादा तामगावे, नातगोंड पाटील, माणिक आवटी, शीतल पाटील, बंडू शेटे, सतीश पवार, रेखा पाटील, अभिमन्यू भोसले, रवींद्र वादवणे, गोपाल पवार, विशाल पवार आदी उपस्थित होते.
चौकट
पतंगराव कदमांची उणीव
पृथ्वीराज पवार म्हणाले, उसाचे एकरी दीड लाख, सोयाबीनचे एक लाखावर, ढबू मिरचीचे ३ लाखांवर, वांगी, टोमॅटोचे एक ते दीड लाख रुपयांचे प्रतिएकरी नुकसान झाले आहे. दिवंगत नेते पतंगराव कदम हे मदत व पुनर्वसन मंत्री होते तेव्हा इकडे घोषणा व्हायची आणि पैसे काही दिवसांत मिळायचे. या सरकारमध्ये असे नेते राहिले नाहीत.