कवलापूरजवळ डंपरच्या धडकेत मोपेडस्वार ठार; ओव्हरटेक करताना धडक : मृत फलटण तालुक्यातील
By घनशाम नवाथे | Updated: August 23, 2024 19:50 IST2024-08-23T19:50:24+5:302024-08-23T19:50:45+5:30
याबाबत डंपर चालक विनायक लक्ष्मण पाटील (वय ५३,रा. काकडवाडी, ता. मिरज) याच्याविरूद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कवलापूरजवळ डंपरच्या धडकेत मोपेडस्वार ठार; ओव्हरटेक करताना धडक : मृत फलटण तालुक्यातील
घनशाम नवाथे
सांगली : सांगली ते तासगाव रस्त्यावर कवलापूर (ता. मिरज) येथील सुवर्णा हॉटेलजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने ओव्हरटेक करताना मोपेडला धडक दिल्यामुळे दयानंद शिवलिंग स्वामी (वय ५३, रा. पाडेगाव फार्म, ता. फलटण, जि. सातारा) हे ठार झाले. शुक्रवारी दुपारी पाऊणच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत डंपर चालक विनायक लक्ष्मण पाटील (वय ५३,रा. काकडवाडी, ता. मिरज) याच्याविरूद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दयानंद स्वामी हे दुपारच्या सुमारास मोपेड (एमएच ११ सीएफ ८३०४) वरून तासगावहून सांगलीच्या दिशेने येत होते. दुपारी पाऊणच्या सुमारास कवलापूर येथील सुवर्णा हॉटेलजवळ सांगलीकडे चाललेल्या डंपर (एमएच ११ सीएच ४२२१) च्या चालकाने वेगाने येऊन बेदरकारपणे ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी डंपरने स्वामी यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली. या धडकेत दयानंद स्वामी हे गंभीर जखमी झाले. त्यांना सिव्हीलमध्ये दाखल केले. परंतू ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सांगली ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
प्रकरणी मृत स्वामी यांचे नातेवाईक चैनय्या मुरग्याप्पा मठपती (वय ३८, रा. मंगलमूर्ती कॉलनी, कुपवाड) यांनी फिर्याद दिली आहे. डंपर चालक विनायक पाटील याच्याविरूद्ध अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.