‘हिंदकेसरीं’चे स्मारक प्रेरणादायी

By Admin | Updated: January 16, 2016 00:12 IST2016-01-16T00:09:01+5:302016-01-16T00:12:25+5:30

जयंत पाटील : कवठेपिरानमध्ये मारुती माने स्मारकाचे भूमिपूजन

Monument inspiration of 'Hindakesar' inspirational | ‘हिंदकेसरीं’चे स्मारक प्रेरणादायी

‘हिंदकेसरीं’चे स्मारक प्रेरणादायी

दुधगाव : मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे हिंदकेसरी मारुती माने यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आ. जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून याचे काम रखडले होते. हिंदकेसरी मारुती माने यांचे स्मारक त्यांची उंची व सन्मानाइतकेच सर्वांच्या स्मरणात राहील असे उभे करू, असे प्रतिपादन आ. जयंत पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड होते.येथील हिंदकेसरी मारुती माने यांच्या स्मारकाचे बांधकाम महाराष्ट्र शासनाच्यावतीने करण्यात येणार आहे. या कामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम शुक्रवारी सकाळी येथील गंजीखाना येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. आ. पाटील यांनी, स्मारकास निधी कमी पडू देणार नसल्याचेही सांगून, काम वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. तमाम कुस्तीगीरांना प्रेरणादायी ठरेल असे सन्मानाचे स्मारक होईल, हे स्मारक सर्वांसाठी पे्ररणादायी ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी, हे स्मारक जिल्ह्याला आदर्श ठरेल असे मत व्यक्त कले. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्ष दिलीप (तात्या) पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले.
स्वागत जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांनी केले. यावेळी हिंदकेसरी मारुती माने यांच्या स्मारकापासून गावातून ज्योत फिरविण्यासाठी गर्ल्स हायस्कूलचे हिंदकेसरी मारुती माने विद्यालय व हिंदकेसरी स्पोर्टस् यांच्यावतीने झांजपथकासह ज्योतीसह प्रमुख मार्गावरून फेरी काढण्यात आली. नामदेवराव मोहिते यांनी आभार मानले.
या कार्यक्रमासाठी नजरुद्दीन नायकवडी, संभाजी सावर्डेकर, व्यंकटराव पाटील, नंदकुमार विभुते, दिगंबर जाधव, बी. के. पाटील, बाळासाहेब पाटील, युवक राष्ट्रवादीचे वाळवा तालुका जिल्हाध्यक्ष संजय पाटील (बापू), सावळवाडीचे नितीन दणाणे, बबुळ जाधव, कवठेपिरानच्या सरपंच सोनाताई गायकवाड, उपसरपंच अर्जुन माने , ग्रामस्थ आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Monument inspiration of 'Hindakesar' inspirational

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.