मान्सून बरसण्याआधी प्रशासन ‘दक्ष’
By Admin | Updated: June 8, 2015 00:49 IST2015-06-07T23:32:17+5:302015-06-08T00:49:06+5:30
आपत्ती निवारण कक्ष सुरू : पूरपरिस्थिती उद्भवल्यास ५५ बोटी सज्ज; खरिपासाठीची तयारी

मान्सून बरसण्याआधी प्रशासन ‘दक्ष’
नरेंद्र रानडे - सांगली -प्रतीक्षेत असलेल्या नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन थोड्याच कालावधित होणार आहे. हवामान खात्याने यंदा कमी पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तविला असला तरी, जिल्हा प्रशासनाने जोरदार पाऊस पडून आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत पूर्ण दक्षता घेतली आहे. जिल्हा प्रशासनाने मागील महिन्यात मान्सूनपूर्व बैठकीचे आयोजन केले होते. शहरात देखील प्रतिवर्षी पावसामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी मनपा प्रशासन सज्ज आहे.
जिल्ह्यातील शिराळा, पलूस, वाळवा आणि मिरज या चार तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण होते. तेथील नागरिकांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी पूर आल्यास तेथील नागरिकांचे स्थलांतर करण्याकरिता ५५ बोटी सज्ज ठेवण्यात आल्या असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता पथके नेमली आहेत. महापालिकेने देखील आपत्ती व्यवस्थापन केंद्र स्थापन केले असून नावाड्यांना खास प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला आहे. पावसाळ्यात सर्वात जास्त धोका हा साथीचे आजार पसरण्याचा असतो. हे लक्षात घेऊन आरोग्य प्रशासनाने पूरपरिस्थिती निर्माण होणाऱ्या संभाव्य ७२ गावांमध्ये ३८ वैद्यकीय पथके तयार ठेवली आहेत.
जिल्ह्याच्या कृषी विभागाने खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आवश्यक असणारी खते आणि बियाणे उपलब्ध करण्यावर सध्या लक्ष केंद्रित केले आहे.
४नदीपातळीवर लक्ष ठेवण्यासाठी कृष्णा खोरे उपखोरे कार्यालयात स्वतंत्र विभाग कार्यान्वित.
४आंतरराज्य समन्वय प्रक्रियेअंतर्गत सांगली, कोल्हापूर, सातारा कार्यक्षेत्रातील १६ धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग तसेच आलमट्टी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाची माहिती घेण्याच्या कामास प्रारंभ. यामुळे पूरपरिस्थिती उद्भवण्याअगोदरच प्रशासन सावध होण्यास सहकार्य.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे अथवा खतांची कोणत्याही प्रकारची टंचाई भासणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. जमिनीत पुरेशी ओल असल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये. तसेच बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात अकरा दक्षता पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
- शिरीष जमदाडे,
जिल्हा कृषी अधीक्षक, सांगली.
पावसाळ्यात कोणतेही साथीचे रोग उद्भवू नयेत यासाठी आरोग्य प्रशासन दक्ष आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक असणाऱ्या एकवीस प्रतिबंधात्मक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. वैद्यकीय बाबींसंबंधी कोणतीही अडचण आल्यास साथ व पूरनियंत्रण कक्ष जि. प.मध्ये सुरु केला आहे.
- डॉ. राम हंकारे,
जिल्हा आरोग्य अधिकारी
आपत्ती व्यवस्थापनासाठी कार्यशाळा
सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांसाठी आपत्ती निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मागील आठवड्यात उपायुक्त प्रशांत रसाळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून सर्वांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. आपत्ती निवारणार्थ शासनाकडून यापूर्वीच एक कोटीचा निधी प्राप्त झाला असून प्रत्येक जिल्ह्याला १० लाख रुपये, सांगलीला १५ लाख निधी मिळाला आहे. आता याच्या खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
मनपातर्फे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पूरपरिस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी नावाड्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
कृषी विभाग
२२ मे २०१५ अखेर जिल्ह्यात उपलब्ध असलेला खत साठा (मेट्रिक टनमध्ये )
खत प्रकारमागणीउपलब्धता
युरिया४७५००१२३१८
अमो. सल्फेट१२९००२५७०
एम.ओ.पी.१७८००४६४५
एन.पी.के.१७१००५६७७