तासगाव : तासगाव तालुक्यातील पेड येथील सहा शेतकऱ्यांनी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात व्याजदर व ती रक्कम देऊनही सावकाराने फसवणूक करून या शेतकऱ्यांची जमीन नावावर करून घेतल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी मांजर्डे येथील सावकार बाळासाहेब ऊर्फ बाळकृष्ण ऊर्फ बाळासाहेब भगवान भगत याच्या विरोधात तासगाव पोलिसात सावकारी व फसवणुकीची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत ॲड. अमित शिंदे व शिवसेना शिंदे गट तालुका अध्यक्ष प्रदीप माने पाटील यांनी दिली.यावेळी ॲड. अमित शिंदे यांनी सांगितले की, तासगाव तालुक्यातील पेड येथील युवराज गोपीनाथ हजारे, विजय गणपती हजारे, पोपट गणपती हजारे, सुरेश चंद्रसेन शेंडगे, रामचंद्र वसंत हजारे, बाळू यशवंत हजारे या सहा शेतकऱ्यांनी सावकार भगत याच्याकडून २००२ ते २००४ या कालावधीत ५० हजार ते एक लाख इतके कर्ज तीन टक्के व्याजदराने घेतले होते. यावेळी हे कर्ज देताना जमीन गहाणवट म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक करून त्याने खुशखरेदी करून घेतली.जमीन त्याने स्वतः व पत्नीच्या नावाने करून घेतली. वरील सर्व शेतकऱ्यांनी सर्व कर्ज व व्याजाची परतफेड केली असून २००२ ते २००७ या कालावधीत हे पैसे त्यांना परत दिले. तेव्हा वरील सर्वांच्यातील व्यवहार संपला होता. बारा वर्षे याबाबत कोणताही विषय राहिला नाही. मात्र, ऑनलाईन सात-बारा करताना वरील जमीन सावकाराच्या नावावर झाली व भगत यांनी आटपाडी येथील बाबासाहेब देशमुख बँकेकडून चार लोकांच्या नावावर एक कोटी रुपयांचे कर्ज काढले. त्यातून त्याने साहेबराव नावाने कोल्ड स्टोरेज उभारणी केल्याचेही फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी सांगितले.आपल्या नावावर कर्ज काढले आहे, हे २०२४ रोजी संबंधित शेतकऱ्यांना कळाले व कागदपत्रे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी पोलिस यांसह अनेकांना निवेदने दिली. मात्र, त्यांना दाद लागू दिली नाही. याबाबत शिवसेना शिंदे गट तालुकाध्यक्ष प्रदीप माने पाटील यांच्याशी भेट झाल्यानंतर या शेतकऱ्यांनी ॲड. अमित शिंदे, अरुणा शिंदे, आर. एल. कदम यांच्याकडे सांगली येथे धाव घेतली व सर्व विषय त्यांना सांगितला गेला.यानंतर न्यायालयात याबाबत तक्रार केली असता न्यायालयाने सावकार किंवा फसवणूक केल्याचा गुन्हा तपास करून दाखल करा, असे आदेश पोलिसांना दिले आहेत. या घटनेत अनेक बाबी उघड करण्यात आल्या आहेत. महसूल विभागाला हाताशी धरून अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपये, शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचा प्रकार समोर आला आहे.
व्याज देऊनही सावकाराने बळकावल्या जमिनी, सांगलीतील पेड येथील शेतकऱ्यांची न्यायालयात धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 13:05 IST