शंभरफुटीच्या पॅचवर्कला अखेर मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:58 IST2021-09-02T04:58:05+5:302021-09-02T04:58:05+5:30
फोटो सुरेंद्र दुपटे लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील शंभरफुटी रस्त्यावरील खड्डे व अतिक्रमणाबाबत ''लोकमत''ने आवाज उठवला होता. त्याची ...

शंभरफुटीच्या पॅचवर्कला अखेर मुहूर्त
फोटो सुरेंद्र दुपटे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील शंभरफुटी रस्त्यावरील खड्डे व अतिक्रमणाबाबत ''लोकमत''ने आवाज उठवला होता. त्याची दखल घेत या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे वाहनचालकांतून समाधान व्यक्त होत आहे.
कोल्हापूर रस्त्यापासून ते विश्रामबाग वीज कार्यालयापर्यंत हा रस्ता केवळ नावालाच शंभरफुटी उरला होता. गॅरेज, हातगाडीवाल्यांनी रस्ता पूर्णत: व्यापला आहे. त्यातच नुकत्याच आलेल्या महापुरात रस्त्याची पुरती वाट लागली होती. कोल्हापूर रोड ते डी मार्टपर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतून वाहनचालकांना मार्ग शोधावा लागत होता. याबाबत ''लोकमत''ने वृत्त प्रसिद्ध केले. आयुक्त नितीन कापडणीस यांनी त्या वृत्ताची दखल घेत तातडीने पॅचवर्क करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले होते.
त्यानुसार बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत संपूर्ण रस्त्याचे पॅचवर्क पूर्ण होईल, असे शाखा अभियंता पी. एम. हलकुडे यांनी सांगितले. दरम्यान, रस्त्याच्या पॅचवर्कचे काम पूर्ण झाले तरी अतिक्रमणामुळे हा रस्ता व्यापलेलाच राहणार आहे. त्यामुळे महापालिकेने अतिक्रमण हटवण्याची मोहीम तातडीने हाती घ्यावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.