सांगली-मिरज रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्यांसाठी मुहूर्त अखेर सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST2021-05-31T04:19:41+5:302021-05-31T04:19:41+5:30
सांगली ते मिरज रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सध्या सुरू आहे, त्यामुळे रस्त्याची सुरक्षितता व सौंदर्य वाढले आहे. लोकमत ...

सांगली-मिरज रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्यांसाठी मुहूर्त अखेर सापडला
सांगली ते मिरज रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सध्या सुरू आहे, त्यामुळे रस्त्याची सुरक्षितता व सौंदर्य वाढले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अनेक अपघात आणि वाहनचालकांच्या तक्रारींची रीघ याची दखल घेत अखेर सांगली-मिरज रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी सुमारे १४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. काही ठिकाणी लाल रंगाचे रिफ्लेक्टरही बसविले जाणार आहेत, त्यामुळे रस्त्याचे सौंदर्यही वाढणार आहे.
सध्या काम गतीने सुरू आहे. वाहनांची संख्या कमी झाल्यानंतर रात्रीच्या वेळी पट्टे मारले जात आहेत. सांगली-मिरजदरम्यान २६ ठिकाणी गतिरोधक आणि झेब्रा पट्टे रंगविले जात आहेत. विशेषत: गतिरोधकांना प्राधान्य देण्यात आले आहे. विश्रामबाग, भारती रुग्णालय, विजयनगर आदी ठिकाणी झेब्रा पट्टे रंगविले जात आहेत. यामुळे रस्त्याचे सौंदर्य वाढले आहे, शिवाय तो सुरक्षितही झाला आहे.
विश्रामबाग ते सांगलीदरम्यान गतिरोधकांमध्ये लाल रंगाचे रिफ्लेक्टरही बसविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे रात्री वाहनाचालकांना ते ठळकपणे नजरेत येतील. हा रस्ता बहुतांश वेळा अंधारात बुडालेला असतो. पथदिवे बंदच असतात. काही ठिकाणी गर्द झाडीमुळेही रस्त्यावर प्रकाश पडत नाही. अशावेळी रिफ्लेक्टर वाहनचालकांना सतर्क करण्याचे काम करतील.
चौकट
अपघातांमध्ये लाखोंची वित्तहानी
सांगली-मिरज रस्त्यावरील गतिरोधक लक्षात न आल्याने अनेकदा गंभीर अपघात झाले आहेत. कृपामयीजवळ गतिरोधक लक्षात न आल्याने वेगातील दोन कंटेनर परस्परांवर आदळून खूपच मोठी हानी झाली होती. भारती रुग्णालय, वालचंद महाविद्यालय, वानलेसवाडी येथील गतिरोधक अजिबात लक्षात न आल्याने अनेकदा गंभीर अपघात झाले आहेत. पट्टे मारल्याने अपघातांना आळा बसणार आहे.
चौकट
१०० मीटर अंतरात पाच गतिरोधक
मिरजेत शास्त्री चौक ते नदीवेस हा रस्ता सहा महिन्यांपूर्वी नव्याने करण्यात आला. बांधकाम विभागाने रहिवाशांच्या सुरक्षिततेची जरा जास्तच काळजी घेतली. अवघ्या १०० मीटर अंतरात तब्बल पाच गतिरोधक बसविले. त्यामुळे वाहनांना हा रस्ता पार करणे म्हणजे दिव्यच ठरत आहे. कोणताही शास्त्रशुद्ध विचार न करता अधिकाऱ्यांनी मनमानीपणे गतिरोधक बसवले आहेत. त्याच्यावर पट्टेही मारले नाहीत.