मोहनराव, संग्रामसिंह बाजी मारणार का?
By Admin | Updated: April 30, 2015 00:24 IST2015-04-29T23:33:50+5:302015-04-30T00:24:10+5:30
जिल्हा बॅँक निवडणूक : दोघांनाही संधी मिळण्याची शक्यता, कडेगाव तालुक्यात चर्चेला उधाण

मोहनराव, संग्रामसिंह बाजी मारणार का?
प्रताप महाडिक -कडेगाव --सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निवडणुकीत कडेगाव तालुका विकास सोसायटी गटातून कॉँग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम यांच्याविरोधात भाजपचे धोंडीराम महिंद यांनी दंड थोपटले आहेत. येथे कॉँग्रेसची मोठी ताकद असल्याने कदम बाजी मारतील, अशी शक्यता आहे.
क ४ मतदारसंघात शेतकरी पॅनेलमधून संग्रामसिंंह देशमुख निवडणूक लढवित आहेत. येथे मजूर आणि औद्योगिक संस्थांतील जिल्ह्यातील मतदारांशी असलेला देशमुख यांचा संपर्क आणि पाठीशी असलेली राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि कॉँग्रेसमधील मदन पाटील गटाची ताकद, यामुळे देशमुखही बाजी मारतील, अशी शक्यता आहे.
बॅँकेच्या संचालक मंडळावर तीन वेळा बिनविरोध आणि एकवेळा निवडणुकीत विजय मिळवून सलग २० वर्षे संचालक असलेले ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांच्या नेतृत्वाखाली रयत सहकार परिवर्तन पॅनेल निवडणूक लढवित आहे. कदम यांना तालुक्यातच शह देण्याच्या निर्धाराने शेतकरी सहकारी पॅनेलमधून धोंडीराम महिंद निवडणूक लढवित आहेत. त्यांना काटशह देऊन मोहनराव बाजी मारणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
विकास सोसायटी गटातून ६२ मतदार आहेत. यापैकी बहुतांशी मतदारांची ताकद आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे येथे निश्चितपणे विजय मिळेल, अशी खात्री कदम व्यक्त करीत आहेत.
क्र. ४ मतदारसंघात शेतकरी पॅनेलचे संग्रामसिंंह देशमुख आणि विष्णू माने यांच्या विरोधात रयत सहकार परिवर्तन पॅनेलचे सी. बी. पाटील व विलास बेले उमेदवार आहेत. या गटामध्ये मजूर आणि औद्योगिक संस्थांतील सर्व जिल्ह्यातील जवळपास तीनशेहून अधिक मतदार आहेत. गत निवडणुकीतही संग्रामसिंंह देशमुख यांना याच गटातून संधी मिळाली होती. देशमुख यांचा मतदारांशी असलेला संपर्क आणि पॅनेलची ताकद यामुळे तेही या निवडणुकीत बाजी मारतील अशी चर्चा आहे.
कडेगाव तालुक्यात कदम आणि देशमुख यांच्या साखर कारखाने, सहकारी संस्था, सूतगिरण्या यामुळे जिल्हा मध्यवर्ती बॅँकेची उलाढाल वाढली आहे आणि बॅँकेला उर्जितावस्था आली आहे. तालुक्यातील बॅँकेच्या सर्व शाखा प्रगतीकडे वाटचाल करीत आहेत. त्यामुळे तालुक्यातील मोहनराव कदम व संग्रामसिंह देशमुख हे प्रभावशाली नेते जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळावर निवडले जातील, अशी शक्यता तालुक्यातील राजकीय जाणकार कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
मोहनराव कदम २0 वर्षे संचालक
कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनराव कदम सोसायटी गटातून सलग तीनवेळा बिनविरोध व एकवेळा निवडणूक लढवून जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळात काम करीत आहेत. सहकारात मजबूत पायावर उभा असल्याने हे शक्य झाले, असे ते सांगतात. होमग्राऊंडवर त्यांना तब्बल २० वर्षे संचालक म्हणून कामकाजाची संधी मिळाली आहे. आताही संधीची शक्यता व्यक्त होत आहे.