मोदी कुर्ता, जाकीटची क्रेझ
By Admin | Updated: October 17, 2014 22:46 IST2014-10-17T21:45:23+5:302014-10-17T22:46:22+5:30
कपड्यांच्या बाजारात गर्दी : लाखोंची उलाढाल

मोदी कुर्ता, जाकीटची क्रेझ
सांगली : दीपावलीतील कपडे खरेदीसाठी कापडपेठेत सांगलीकरांनी गर्दी केली आहे. यंदा लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोदी कुर्ता आणि जाकीटची क्रेझ आहे. या आठवड्यात कपड्यांच्या बाजारपेठेत लाखोंची उलाढाल होणार आहे.
सांगलीतील अनेक कापड दुकानदारांनी ‘खास योजना’ जाहीर केल्या आहेत. दोन शर्ट खरेदीवर एक मोफत अथवा दुकानातून विशिष्ट रकमेची खरेदी केल्यास ट्रॅव्हल बॅग मोफत, अशा योजनांचा त्यामध्ये समावेश आहे. कपडे शिवून घेण्यापेक्षा तयार कपडे घेण्याकडे अनेकांचा कल असल्याचे दिसत आहे. दुकानात विक्रीस असणाऱ्या फॅन्सी जीन्स १२०० ते २१०० रुपये या दरात, तर स्ट्रेचेबल जीन्स ५९९ ते १२९५ या किमतीत उपलब्ध आहेत. फॉर्मल ट्राऊझर ६०० ते १९०० या दरात विक्रीस आहेत.
ब्रँडेड कपडे घेण्याकडेच अनेकांचा कल आहे. महिलांसाठी अमरेला स्टाईल चुडीदार, स्ट्रेट कट ड्रेस, अनारकली, आलिया आदी प्रकारातील ड्रेस विक्रीस आले आहेत. त्याचप्रमाणे ‘लेडीज जीन्स’ना देखील अधिक मागणी आहे. सुमारे ५०० ते १५०० या किमतीत त्या विक्रीस आहेत. जीन्सवर परिधान करण्याकरिता लेगिन्स आणि कुर्ती घेण्यास युवती प्राधान्य देत आहेत.
स्टेशन चौक परिसर आणि राजवाडा परिसरातील रस्त्यावरील विक्रेते मुंबई, कोलकाता, दिल्ली येथून होलसेल कपडे आणून त्यांची विक्री करीत आहेत. दुकानामधील कपड्यांच्या किंमतीपेक्षा रस्त्यावरील स्टॉलवर मिळणाऱ्या कपड्यांच्या किमती सुमारे ४० टक्के कमी आहेत. प्रतिवर्षी चित्रपट अभिनेते-अभिनेत्रींनी आणलेली फॅशन बाजारात येत असते. यंदा मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी फेम ‘मोदी कुर्ता आणि जाकीट’ बाजारपेठेत दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्यावेळी युवक वर्गामध्ये मोदी कुर्ता लोकप्रिय होता. सध्या युवक वर्गातून चायनीज कॉलर शर्ट, मिलिट्री बाउंडिंग पॅन्ट यांना मागणी आहे. लहान मुलांतही मोदी कुर्त्याचे आकर्षण आहे. ३०० ते ४०० रुपयांमध्ये विविध रंगात हा कुर्ता उपलब्ध आहे. (प्रतिनिधी)
चायनीज कॉलर शर्टची तरुणांकडून मागणी
सध्या युवक वर्गातून चायनीज कॉलर शर्ट, मिलिट्री बाउंडिंग पॅन्ट यांना मागणी आहे. लहान मुलांतही मोदी कुर्त्याचे आकर्षण आहे. ३०० ते ४०० रुपयांमध्ये विविध रंगात हा कुर्ता उपलब्ध आहे.