मोदींचे इमान शेतकऱ्यांशी नव्हे, उद्योगपतींशी
By Admin | Updated: May 11, 2015 00:40 IST2015-05-11T00:36:44+5:302015-05-11T00:40:37+5:30
उल्का महाजन : भूमी अधिग्रहण कायदाविषयक चर्चासत्रातील मत

मोदींचे इमान शेतकऱ्यांशी नव्हे, उद्योगपतींशी
सांगली : ‘अच्छे दिन’ येण्याची स्वप्ने दाखवत सर्वसामान्यांची मते मिळवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सत्ताधारी झाल्यावर मात्र आपले खरे रूप दाखविण्यास प्रारंभ केला आहे. भूमिअधिग्रहण कायद्यासाठी आग्रही असणाऱ्या मोदींचे इमान शेतकऱ्यांशी नव्हे, उद्योगपतींशी असल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी रविवारी व्यक्त केले.
सांगली जिल्हा सुधार समितीच्यावतीने ‘भूमी अधिग्रहण कायदा’ या विषयावर पत्रकार संघ सभागृह येथे आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर अॅड. के. डी. शिंदे, शंकर पुजारी, रमेश सहस्त्रबुद्धे, अॅड. अजित अभ्यंकर, अॅड. अमित शिंदे आदी उपस्थित होते.
उल्का महाजन म्हणाल्या, आतापर्यंत सेझच्या नावाखाली सरकारने संपादित केलेल्या ५७ टक्के जमिनी या वापराविना पडून आहेत. नवीन कायदा करण्यापूर्वी प्रथम संबंधित जमिनींचा वापर आतापर्यंत का गेला नाही, याचे उत्तर द्यावे. संरक्षण, ग्रामीण पायाभूत सुविधा, औद्योगिक वसाहत आदीसाठी शेतकऱ्यांची संमती गरजेची नाही, असे धोरण सरकारने तयार केले आहे. देश व विदेशातील खासगी उद्योगपतींना जमिनीचे भांडवलात रूपांतर करून जागतिक साम्राज्यवाद निर्माण करावयाचे असल्याचेही महाजन यांनी सांगितले. यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)