मिरजेतील तंतूवाद्य कारागिरांना आधुनिक यंत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:22 IST2021-02-15T04:22:58+5:302021-02-15T04:22:58+5:30

विविध कारणांमुळे अडचणीत असलेल्या तंतूवाद्य निर्मिती कलेस हस्तकलेचा दर्जा देऊन उद्योग मंत्रालयातर्फे तंतूवाद्य कारागिरांसाठी मिरजेत क्लस्टर योजना ...

Modern instruments to the stringed artisans of Miraj | मिरजेतील तंतूवाद्य कारागिरांना आधुनिक यंत्रे

मिरजेतील तंतूवाद्य कारागिरांना आधुनिक यंत्रे

विविध कारणांमुळे अडचणीत असलेल्या तंतूवाद्य निर्मिती कलेस हस्तकलेचा दर्जा देऊन उद्योग मंत्रालयातर्फे तंतूवाद्य कारागिरांसाठी मिरजेत क्लस्टर योजना व साडेतीन कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. मिरजेतील तंबोरा व सतार या दर्जेदार तंतूवाद्याचा देशात व परदेशात लौकिक आहे. सुरेल आवाज, टिकाऊपणा, सुबकता यामुळे मिरजेतील सतार व तंबोऱ्यांना विविध मानसन्मान मिळाले आहेत. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतकला टिकविण्याचे श्रेय तंतूवाद्य कारागिरांनाही आहे. मात्र तंतूवाद्यांची घटलेली मागणी, कच्च्या मालाचे वाढलेले दर, यासह विविध अडचणींमुळे मिरजेतील तंतूवाद्य निर्मिती कारागिरांची संख्या घटत आहे. इलेक्ट्रॉनिक वाद्यांमुळे तंतूवाद्य निर्मिती व्यवसायाला फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर उद्योग विभागातर्फे तंतूवाद्य कारागिरांसाठी मिरजेत क्लस्टर मंजूर करण्यात आले आहे. क्लस्टर योजनेअंतर्गत कारागिरांना विमा, तंतूवाद्य निर्मात्यांसाठी दुकाने, संशोधन व निर्मितीसाठी जागा उपलब्ध करुन तंतूवाद्यांना बाजारपेठ मिळवून देण्यात येणार आहे. मिरजेतील औद्योगिक वसाहतीत शासनाच्या जागेत तंतूवाद्य कारागिरांना सामुदायिक सुविधा केंद्र निर्मितीसाठी साडेतीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या जागेत तंतूवाद्य निर्मिती केंद्र‍ाच्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. क्लस्टर योजनेसाठी सुमारे दोनशे तंतूवाद्य कारागिरांसाठी मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर कंपनीची निर्मिती करण्यात आली आहे. तंतूवाद्य कारागिरांसाठी सुमारे ७० लाख किमतीची वाद्ये तयार करणारी आधुनिक यंत्रे उपलब्ध झाली आहेत. १५ दिवसात ही यंत्रे कार्यान्वित होणार असून यामुळे तंतूवाद्याची निर्मिती जलद गतीने होणार असल्याचे कंपनीचे अध्यक्ष मोहसीन मिरजकर यांनी सांगितले.

तंतूवाद्य कारागिरांना केंद्राच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी स्वतंत्र कंपनीची निर्मिती करण्यात आली आहे. केंद्रीय हस्तकला विभागातर्फे तंतूवाद्य कारागिरांना प्रशिक्षण व वाद्य निर्मितीसाठी आधुनिक साधने व अवजारे वाटप करण्यात येत आहे.

फाेटाे : १४ मिरज १..२..३..४..५..६..७

Web Title: Modern instruments to the stringed artisans of Miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.