इस्लामपुरातील बंड्या कुटे गँगवर मोक्काचे दोषारोपपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:31 IST2021-09-12T04:31:12+5:302021-09-12T04:31:12+5:30
इस्लामपूर : सेंट्रिंग मजुराकडील दोन हजार रुपये लुबाडण्याच्या उद्देशाने त्याला जबरदस्तीने कापूसखेड रस्त्यावर नेऊन डोक्यात लोखंडी गज मारून त्याचा ...

इस्लामपुरातील बंड्या कुटे गँगवर मोक्काचे दोषारोपपत्र
इस्लामपूर : सेंट्रिंग मजुराकडील दोन हजार रुपये लुबाडण्याच्या उद्देशाने त्याला जबरदस्तीने कापूसखेड रस्त्यावर नेऊन डोक्यात लोखंडी गज मारून त्याचा खून करणाऱ्या बंड्या कुटे गँगमधील तिघांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याखाली येथील मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली. विभागातील ही आठवी कारवाई असून, आतापर्यंत ४३ गुंड गजाआड झाले आहेत.
संदीप ऊर्फ बंड्या शिवाजी कुटे (वय २२, लोणार गल्ली, इस्लामपूर), ऋतिक दिनकर महापुरे (२१, खांबे मळा, इस्लामपूर) आणि अनिल गणेश राठोड (२६, लोणार गल्ली, इस्लामपूर, मूळ रा. ऐनापूर, जि. विजापूर) अशी या तिघांची नावे आहेत. तिघांनी राजेश सुभाष काळे (३५, नेहरूनगर, इस्लामपूर) याचा खून केल्याचा ठपका आहे. इस्लामपूरसह आष्टा शहरातील गुंडांच्या आठ टोळ्यांवर मोक्काची कारवाई झाली आहे.
पिंगळे म्हणाले की, ८ मार्चच्या रात्री राजेश काळे दारू पिऊन चेतना देशी दारूच्या दुकानाजवळ पडला होता. यावेळी हे तिघे या दारू दुकानासमोरून जात होते. दुचाकीवरून उतरुन एकाने काळेकडील पैसे काढून घेण्याच्या उद्देशाने त्याचे खिसे तपासले. मात्र हा परिसर रहिवासी वस्तीत असल्याने दंगा होऊ नये म्हणून काळेला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून कापूसखेड रस्त्यावरील निर्जनस्थळी घेऊन गेले. तेथे त्याच्या पँटच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेत असताना त्याने प्रतिकार केला. त्यावेळी बंड्या कुटे याने दुचाकीला लावलेला लोखंडी गज काढून त्याच्या कानाजवळ मारला. त्यातूनही सुटका करून घेण्यासाठी राजेश काळे याने पळ काढला. मात्र तिघांनी त्याला गाठून खाली पाडले आणि अनिल राठोडने त्याच्या डोक्यात दगड घातला, त्यात काळे जागीच ठार झाला होता.
चौकट
आता कारागृहातच मुक्काम
तत्कालीन निरीक्षक नारायण देशमुख यांनी या टोळीविरुद्ध मोक्का कारवाईचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठवला होता. अप्पर पोलीस महासंचालक डॉ. राजेंद्र सिंग यांनी दोषारोपपत्र दाखल करण्यास अंतिम मंजुरी दिली. त्यानंतर या टोळीविरुद्ध इस्लामपूरच्या मोक्का न्यायालयात ते दाखल करण्यात आले. हवालदार संदीप सावंत यांनी तपासकामी मदत केली.