ओएलएक्सद्वारे ओळख करून मोबाइल चोरणाऱ्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:22 IST2021-02-05T07:22:50+5:302021-02-05T07:22:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ओएलएक्सद्वारे मोबाइल विक्रीची जाहिरात देणाऱ्याचा मोबाइल घेऊन पळून जाणाऱ्या दोघांना सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक ...

ओएलएक्सद्वारे ओळख करून मोबाइल चोरणाऱ्यांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ओएलएक्सद्वारे मोबाइल विक्रीची जाहिरात देणाऱ्याचा मोबाइल घेऊन पळून जाणाऱ्या दोघांना सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी श्रीकांत महेंद्र पाटील (रा. निमणी, ता. तासगाव) याने फिर्याद दिली होती. त्यानुसार रोहित नारायण केसरकर (शिवाजी पेठ, कोल्हापूर) व आशिष दत्तात्रय गायकवाड (रा. उजळाईवाडी, कोल्हापूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
श्रीकांत पाटील याने डिसेंबर महिन्यात ओएलएक्सच्या माध्यमातून त्याचा ३० हजार रुपये किमतीचा मोबाइल विकण्याबाबत जाहिरात दिली होती. ती पाहून संशयितांनी त्यास संपर्क साधला व मोबाइल विकत घेण्याचा बहाणा करून मोबाइल घेऊन पसार झाले होते. या प्रकरणाचा तपास करून संशयिताना अटक करत त्यांच्याकडून मोबाइल हस्तगत करण्यात आला होता. त्यानंतर हा मोबाइल श्रीकांत पाटील यास परत देण्यात आला.
पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अतुल निकम, भारत रेड्डी, सागर पाटील, संदीप मोरे, महादेव चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.