सांगली : मोबाईलच्या स्क्रीन गार्डच्या किंमतीवरून चौघा अल्पवयीन मुलांनी दुकानातील काम करणाऱ्या कामगाराचा कोयत्याने, चाकूने वार करून निर्घृण खून केला. प्रजासत्ताक दिनी दुपारी बाराच्या सुमारास बसस्थानक रस्त्यावरील भैरवनाथ मोबाईल शॉपीमध्ये हा प्रकार घडला. विपुलपुरी अमृतपुरी गोस्वामी (वय १९, रा. नयना अपार्टमेंट, बापटबाल शाळेजवळ, सांगली, मूळ रा. सिवाडा, ता. शितलवाना, जि. जालोर, राजसथा) या कामगाराला अवघ्या ५० रूपयासाठी जीव गमवावा लागला. शहर पोलिसांनी चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.अधिक माहिती अशी, बसस्थानक रस्त्यावर दिनेश गिरी यांच्या मालकीचे मोबाईल शॉपी व दुरूस्तीचे दुकान आहे. हे दुकान विजयनाथ गोस्वामी हे वर्षापासून चालवत आहेत. या दुकानात मृत विपुलपुरी हा सहा महिन्यापासून नोकरीस होता. विपुलपुरी याचा चुलत भाऊ स्वरूपपुरी हा दि. २६ रोजी कामास सुटी असल्यामुळे विपुलपुरी याला मदत करण्यासाठी सकाळी दहा वाजता त्याच्या दुकानात गेला. दुकानमालक विजयनाथ हे दुपारी बाराच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाले. तेव्हा चार अनोळखी अल्पवयीन मुले शॉपीमध्ये आली. विजयनाथ यांनी विपुलपुरी याला हे चौघेजण मवाली वाटत आहे, त्यांना काय हवे ते बघ, वाद घालू नकोस असे समजावून सांगून ते निघाले.
दुकानात आलेल्या चौघांनी विपुलपुरी याला मोबाईलला स्क्रीनगार्ड लावून दे असे सांगितले. विपुलपुरीने आमच्याकडे शंभर रूपयाची ग्लास आहे, असे सांगितले. तेव्हा एकाने आम्हाला पन्नास रूपयात बसवून पाहिजे असे दरडावले. तेव्हा विपुलपुरीने कमीत कमी ८० रूपयात बसवून देतो असे सांगितले. चौघांनी आम्हाला पन्नास रूपयातच बसवून पाहिजे असे म्हणून भांडण काढण्यास सुरूवात केली. तेव्हा विपुलपुरी याने काऊंटरच्या बाहेर येत आमच्या बसस्थानकाजवळील ओमसाई दुकानात जा असे बोट दाखवून सांगितली. तेवढ्यात चौघेजण काऊंटर ढकलून आत आले. विपुलपुरी याला घेराव घालून लाथाबुक्क्यांनी मारण्यास सुरूवात केली. दोघांनी त्याला पकडून ठेवल्यानंतर एकाने कोयता काढला. तर दुसऱ्याने पाईपमधून चाकू बाहेर काढला. विपुलपुरीच्या डोक्यावर, हातावर, पाठीत, पोटावर वार केले.अचानक झालेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या स्वरूपपुरी याने चौघांना अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दोघांनी त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. एकाने कोयत्याने वार केला. तो चुकवताना कंबरेवर कोयता घासला. भीतीने स्वरूपपुरी आरडाओरडा करत दुकानाबाहेर पळाला. तेव्हा रिक्षावाले व इतर जमले. लोक जमल्याचे पाहून चौघेजण हत्यार टाकून पळाले.
उपचारादरम्यान मृत्यूजखमी विपुलपुरी याला परिसरातील नागरिकांनी रिक्षातून तातडीने सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्याचा दुपारी दोनच्या सुमारास मृत्यू झाला.
चौघेजण ताब्यातखुनानंतर चौघेजण मोबाईल शॉपीतून पळून गेले. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी उपनिरीक्षक महादेव पोवार व पथकाला सूचना दिल्या. सीसीटीव्ही फुटेज तपासून शोध घेत असताना चौघेजण बायपास रस्त्यावरील नवीन पुलाजवळ लपल्याची माहिती मिळाली. पथकाने तत्काळ चौघांना ताब्यात घेतले.
नातेवाईकांसह अनेकांना धक्काहजार किलोमीटरवरून पोटापाण्यासाठी आलेले सहा ते सातजण राजस्थानी युवक येथे एकत्रित भाड्याने राहत आहेत. प्रामाणिकपणे राबून खात आहेत. परंतू गुन्हेगारी वृत्तीच्या चौघांनी विपुलपुरी या युवकाचा क्षुल्लक कारणातून खून केल्याचे समजताच त्याचे नातेवाईक, मित्र यांना धक्का बसला.